‘शासकीय संस्थेत प्रसुती करा, सर्व योजनांचा लाभ घ्या’

जिल्हा परिषदेची नवी शक्कल

रत्नागिरी:- शासकीय रुग्णालयात प्रसुती झाल्यानंतर शासनाच्या अनेक योजना लागू होतात. पण सध्या शासकीय रुग्णालयात त्यामानाने प्रसुती करण्यासाठी स्त्रिया येत नसल्याचे दिसून येत आहे. यासाठी आता जि.प.च्या आरोग्यातर्फे जनजागृती करण्याची मोहीत हाती घेण्यात आली आहे. ‘शासकीय संस्थेत प्रसुती करा आणि सर्व योजनांचा लाभ घ्या’, असे आवाहन जि. प. तर्फे करण्यात येत आहे.

संस्थात्मक प्रसूतिसाठी आरोग्य विभागाकडून अनेक योजना व कार्यक्रम राबविले जातात. यापैकी एक म्हणजे जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम यामध्ये गरोदर मातेस प्रसुतीसाठी घरापासून आरोग्य संस्थेपर्यंत तसेच प्रसुतीनंतर पुन्हा आरोग्य संस्थेपासून घरापर्यंत 102 किंवा 108 अम्बुलन्सद्वारे मोफत वाहन व्यवस्था केली जाते. प्रसूतीसाठी कुठल्या योग्य शासकीय संस्थेची गरज आहे हे बघून पुढील संदर्भसेवा दिली जाते. तसेच मोफत सिझेरियन प्रसुती सेवा, मोफत औषधे व उपयुक्त साहित्य, मोफत रक्त तपासणी, लघवी तपासणी, अल्ट्रा सोनोग्राफी चाचणी, मोफत रक्तसंक्रमण सुविधा इ. सेवा पुरविल्या जातात.

तसेच रुग्णालयात दाखल असताना सामान्य प्रसूतीसाठी 3 दिवस व सिझेरियन प्रसुतीसाठी 7 दिवस मोफत भोजन व्यवस्था केली जाते. त्याबरोबर बालकासाठी पण 30 दिवसापर्यंत सर्व आरोग्य सुविधा मोफत दिल्या जातात. तसेच बालकाला पुढेही 1 वर्षापर्यंत सर्व आरोग्य सुविधा भेटतात. शासकीय संस्थेत सिझेरियन साठी 1500 रु. चा लाभ दिला जातो. शासकीय रुग्णालयात प्रसुती झाल्यास जननी सुरक्षा योजनेंतर्गत पात्र मातेस शहरी भागात म्हणजे जिल्हा रुग्णालय येथे 600 व ग्रामीण भागात म्हणजे उपकेंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय इ. ठिकाणी 700 रु.चा लाभ दिला जातो. तसेच मातृ वंदना योजने अंतर्गत जर मातेने शासकीय संस्थेत गरोदरपणाची नाव नोंदणी केली असेल व ती योजनेस पात्र असेल तर पहिल्या अपत्यासाठी 5000 रु.व दुसरे अपत्य हे स्त्री असेल तर 6000 रु चा लाभ दिला जातो. असे जि.प.तर्फे सांगण्यात आले आहे.