शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इमारत उभारणीचा मार्ग मोकळा

चंपक मैदान येथील 20 एकर जागा 99 वर्षांच्या कराराने

रत्नागिरी:- नव्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इमारत उभारणीचा मार्ग मोकळा झाला असून एमआयडीसीने उद्यमनगर चंपक मैदान येथील 20 एकर जागा 99 वर्षांच्या कराराने वैद्यकीय महाविद्यालयाला दिली आहे. या ठिकाणी जेआयसीएच्या माध्यमातून 650 कोटी रुपये खर्च करून भव्यदिव्य इमारत उभी राहणार आहे. पावसाळ्यानंतर प्रत्यक्षात बांधकामाला सुरूवात होणार असून पुढील चार वर्षात वैद्यकीय महाविद्यालयाची टोलेजंग इमारत शहराच्या वैभवात भर घालणार आहे.

राज्य शासनाच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यासाठी सुमारे चार वर्षांपूव वैद्यकीय शासकीय महाविद्यालय मंजूर झाले. जागेची उपलब्धता होत नसल्याने महाविद्यालयाच्या प्रत्यक्ष कामकाजाला विलंब झाला. दोन वर्षांपूव महिला रूग्णालयाच्या इमारतीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात आले. सलग दोन वर्षे तेथे अभ्यासक्रम सुरू आहे.

राष्ट्रीय आयुर्विज्ञान परिषदेच्या नियमानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतींसाठी 20 एकर जागा आवश्यक होती. शहरानजिक एवढ्या मोठ्या प्रमाणात शासकीय जमीन उपलब्ध नव्हती. त्यामुळे नव्या इमारतीचे बांधकाम रखडले होते. उद्योगमंत्री ना.उदय सामंत यांनी खात्याचा पदभार स्वीकारल्यानंतर उद्यमनगर येथील स्टरलाईटच्या ताब्यात असलेली अडीचशे हेक्टर जागा न्यायालयीन लढाई पूर्ण करून एमआयडीसीच्या ताब्यात घेतली.

राज्यात प्रथमच एमआयडीसीच्या जागेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचा निर्णय उद्योग विभागाने घेतला. त्यानुसार एमआयडीसीने 20 एकर जागा 99 वर्षे कराराने नाममात्र दरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला दिली आहे. याबाबतचा लेखी करार पूर्ण झाला असून जागेचा ताबा वैद्यकीय महाविद्यालयाला देण्यात आला आहे.

चंपक मैदान येथील 20 एकर जागेवर राज्य सरकार व जेआयसीए संस्थेमार्फत सुसज्ज इमारत उभी राहणार आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या एकूण 25 विभागांसाठी ही इमारत असेल तर रूग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय, विद्याथ-विद्यार्थिनी हॉस्टेल, नर्सिंग महाविद्यालय, अधिष्ठाता, प्राध्यापक निवासस्थाने, सुसज्ज ग्रंथालय, कर्मचारी वाहन पार्किंग यासाठी आवश्यक इमारतींचा समावेश असेल.
सुसज्ज वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी 650 कोटी रुपयांची आवश्यकता आहे. जेआयसीए संस्थेमार्फत या महाविद्यालयाची उभारणी करण्यात येणार आहे. यासाठी संस्थेने प्राथमिक पाहणी केली असून दुसऱ्या टप्प्यात भूगर्भ तपासणी करण्यात आली तर आज दि.21 मे रोजी संस्थेचे पथक प्रत्यक्ष जागा पाहणीसाठी रत्नागिरीत दाखल होणार आहे.

जागा उपलब्ध होण्यापूव वैद्यकीय महाविद्यालयाचे 595 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. परंतु आवश्यक 20 एकर जागा प्राप्त झाल्यानंतर सुधारीत अंदाजपत्रक आठ दिवसात तयार करण्याच्या सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री ना.हसन मुश्रीफ यांनी दिले आहेत. त्यानुसार नवे अंदाजपत्रक सुमारे 650 कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. इमारत उभारण्यासाठी आवश्यक मान्यता मिळाल्यानंतर प्रत्यक्षात बांधकामाला सुरूवात होणार आहे. पावसाळ्यानंतर भूमीपुजनाचा सोहोळा संपन्न होण्याची शक्यता आहे.