शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शिक्षणाचा झाला श्रीगणेशा

उद्योगमंत्री उदय सामंत यांचे स्वप्न झाले साकार, लवकरच मुख्यमंत्र्यांचे हस्ते उदघाटन

रत्नागिरी:- जिल्हावासियांचे गेल्या अनेक वर्षांचे स्वप्न अखेर पूर्ण झाले असून, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बुधवारी खर्‍या अर्थाने सुरु झाले. महाविद्यालयाच्या पहिल्याच दिवशी शंभर विद्यार्थी उपस्थित होते. या विद्यार्थ्यांचे स्वागत करतानाच, वैद्यकीय महाविद्यालयासाठी विशेष प्रयत्न करणार्‍या उद्योगमंत्री उदय सामंत यांचेही महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांनी आभार मानले. या महाविद्यालयाचे अधिकृत उद्घाटन लवकरच राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थित केले जाणार आहे.

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री झाल्यानंतर रत्नागिरीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे यासाठी उदय सामंत यांचा प्रयत्न सुरु होता. रत्नागिरीत शासकीय इंजिनिअरींग कॉलेज, फार्मसीसह, संस्कृत शिक्षणासाठी कवी कालिदास संस्कृत विद्यापिठाचे उपकेंद्र, स्कील इंडिया उपक्रमासह अनेक शैक्षणिक उपक्रम रत्नागिरीत सुरु केले. सत्ताबदल झाल्यानंतर राज्याचे उद्योगमंत्री पदी निवड झाल्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी त्यांनी अधिक प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साथ देताना, ना. सामंत यांनी उद्योगमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वीच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी दिली.

यानंतर विशेष लक्ष घालून राज्य व केंद्राकडून विविध परवानग्या आणून ना. उदय सामंत यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला गती दिली होती.
या महाविद्यालयासाठी पहिल्या वर्षी 100 विद्यार्थ्यांना मंजुरी मिळाली असून त्यात 85 विद्यार्थी महाराष्ट्रातील व 15 देशभरातील विद्यार्थ्यांचा समावेश असून बुधवारी पहिल्याच दिवशी वैद्यकीय महाविद्यालयात शंभर विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

या महाविद्यालयासाठी तज्ज्ञ प्राध्यापकांची नियुक्ती झाली असल्याने, वैद्यकीय अधिकारी शासकीय रुग्णालयाच्या सेवेतही दाखल झाले आहे. भविष्यात या महाविद्यालयामधून शिक्षण घेऊन डॉक्टर होणारे विद्यार्थी येथील रुग्णालयात सेवा दिल्यास येथील रुग्णालयातील डॉक्टरांचा प्रश्नही निकाली निघणार आहे.

बुधवारी पहिल्याच दिवशी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना अल्पावधितच महाविद्यालयासाठी उत्कृष्ट इमारतीचे नियोजन केल्याबद्दल उद्योगमंत्री व पालकमंत्री उदय सामंत यांचे आभार मानले.