शासकीय कामकाजात पेंडिंग हा शब्द असू नये; जनतेच्या कामाचा तत्काळ निपटारा करा : खा. राणे

रत्नागिरीतील जनता दरबारात १०५ तक्रारी दाखल

रत्नागिरी:- अधिकाऱ्यांनी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न समजून घेतले पाहिजे आणि त्याचा तात्काळ निपटारा केला पाहिजे. उद्या या, परवा या असे न करता काम कसे पूर्ण करता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे. पेंडिंग हा शब्द असता कामा नये. अधिकाऱ्यांवर माझा पूर्ण विश्वास आहे ते नक्की जनतेच्या प्रश्नांना न्याय देतील असे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री रत्नागिरी सिंधदुर्गचे खा. नारायण राणे यांनी केले.

खा. राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील नियोजन मंडळ सभागृहात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आ. किरण सामंत, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, भाजपा नेते प्रशांत यादव, भाजप पदाधिकारी, पोलीस प्रशासन अधिकारी उपस्थित होते. यावेळी खा. राणे यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की रत्नागिरीतील जनता दरबारात 105 निवेदने प्राप्त झाली आहेत. या सर्व निवेदनांची मी दखल घेतली आहे. काहींची तात्काळ कारवाई करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले आहे तर काही निवेदनांबाबत संबंधित विभागांकडे पुढील पंधरा दिवसात कार्यवाही करून आपल्याला अहवाल पाठवा असे निर्देश दिले आहेत. जनता दरबारातील उपस्थित प्रश्नांच्या पाठपुरावा करून सर्व प्रश्न सोडवणार, सर्वसामान्य जनतेची कामे प्राधान्याने झाली पाहिजे, केंद्र व राज्य शासनाची निगडित असलेले प्रश्न सोडविण्यासाठी मी लोकप्रतिनिधी म्हणून प्रशासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करणार. लोक आपल्यावर भरभरून प्रेम करतात म्हणून लोकांनी चिपळूण, देवरुख आणि आज रत्नागिरी जनता दरबारात हजेरी लावली आणि आपले प्रश्न मांडले. हे प्रश्न सोडवणे आपले कर्तव्य आहे आणि निश्चित आपण तेच सोडवू असा विश्वास यावेळी खा. राणे यांनी दिला.

खा. राणे म्हणाले केंद्रातील आणि राज्यातील सरकार हे सर्वसामान्य जनतेसाठी काम करणारे सरकार आहे जनतेसाठी अनेक योजना राबविण्यात आले आहेत व भविष्यातही जनता हाच केंद्रबिंदू ठेवून केंद्र आणि राज्य सरकार काम करणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने अनेक धाडसी निर्णय घेतले आहेत. 370 कलम रद्द केले आहे, तर 80 कोटी जनतेला मोफत धान्य पुरविले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वसामान्य जनतेसाठी जीएसटी करात केलेली कपात सर्वसामान्य जनतेला दिलासा देणारी ठरली आहे. अशा अनेक योजना सांगता येतील ज्याने सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडवले आहे. अधिकाऱ्यांनी सुद्धा सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना झटपट न्याय दिला पाहिजे. कायद्याच्या बाहेर जाऊन काही करा असे मी सांगणार नाही पण कायद्याच्या चौकटीत राहून जनतेच्या प्रश्नांचा झटपट निपटारा करा, कोणत्याही कार्यालयात गेल्यावर त्या जनतेला आपले काम होणार असा विश्वास वाटला पाहिजे आणि त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसला पाहिजे यासाठी अधिकाऱ्यांनी काम केले पाहिजे. मोठ होणं सोपं असतं, पण ते मोठेपण टिकवणे कठीण असते या लेखक वि. स. खांडेकर यांच्या ओळी सांगताना जनतेने जे मोठेपण दिले आहे ते टिकवण्यासाठी अधिकारी व कार्यकर्त्यांनी देखील काम करा. नुसते डोळे असून चालत नाही तर विकासाची दृष्टी असावी लागते. रत्नागिरी देखील विकासाच्या दिशेने जात असताना या वाटचालीस हातभार लावण्यासाठी, रत्नागिरी अधिक समृद्ध करण्यासाठी आपण प्रयत्न करूया असे आवाहन खा. राणे यांनी यावेळी केले.

गेले तीन दिवस मी रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आहे. चिपळूण, देवरुख आणि आज रत्नागिरी येथे जनता दरबार झाला. या जनता दरबारात रस्ते, वीज, पाणी, पूल, साकव याचबरोबर शाळा दुरुस्ती, पाणी योजना यांचे प्रश्न आले आहेत. तर बेरोजगारी याबाबत अनेकांनी निवेदने दिली आहे. या सर्व प्रश्नांबाबत आपण नक्कीच सकारात्मक निर्णय घेऊ असेही ते म्हणाले.

रत्नागिरीतील या जनता दरबारात रत्नागिरी सह राजापूर लांजा तालुक्यातील अनेकांनी हजेरीला वर आपले प्रश्न मांडले. राजापुरातील शेतकरी विनायक कदम यांनी राजापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर असलेली बेरोजगारी दूर करण्यासाठी आणि विकासाचा बॅकलॉग भरून करण्यासाठी रिफायनरी प्रकल्प व्हावा अशी मागणी केली व याबाबतची निवेदन देत आम्हाला पेट्रोलियम मंत्र्यांची भेट घडवून द्यावी अशी मागणी केली. यावर खासदार राणे यांनी या प्रकल्पाबाबत अधिकारी वर्गाशी चर्चा करूया त्यानंतर पेट्रोलियम मंत्र्यांची भेट देखील घेऊया आणि योग्य तो निर्णय घेऊया अशी ग्वाही दिली. या जनता दरबारात रत्नागिरी व साखरीनाटे येथील मच्छीमार बांधवांनी देखील आपल्या समस्या मांडल्या या समस्या नक्कीच मार्गी लावल्या जातील अशी ग्वाही यावेळी खासदार राणे यांनी दिली. चिपळूण तालुका, संगमेश्वर तालुका आणि रत्नागिरी तालुका अशा तीन ठिकाणी पहिल्या टप्प्यात हे जनता दरबार झाले आहेत. आता पुढील महिनाभरात राजापूर आणि अन्य तालुक्यांसाठी आयोजन केले जाणार असल्याचे खासदार राणे यांनी सांगितले. राजापुरातून विनायक कदम फारूक साखरकर शितल पटेल शितल रहाटे प्रल्हाद तावडे राजा काजवे विशाल सरफरे तसेच राज्यातील श्रीकृष्ण हेगिष्टे,संजय यादव, यांसह रत्नागिरीतील बिजली खान अशा अनेकांनी आपले प्रश्न व समस्या निवेदने देत खासदार राणे यांच्यासमोर मांडले.