रत्नागिरी:- नवीन शैक्षणिक वर्षाची सुरूवात 15 जूनपासून होणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांपर्यंत गणवेश पोहोचला, पाठ्यपुस्तकेही पोहोचली. मात्र शाळांमध्ये शिकवायला शिक्षक देणार कधी? शैक्षणिक सत्र सुरू व्हायची वेळ आली तरी शिक्षणमंत्र्यांच्या कोकणातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षक मिळेनात, अशी स्थिती आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सध्या 1803 जागा रिक्त आहेत.
जिल्ह्यात शाळेच्या पहिल्या दिवशी 2 हजार 494 शाळांमध्ये प्रवेशोत्सव उपक्रम राबविण्यात येणार आहे. शाळांचा परिसर सजविण्यासोबत पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत, प्रभात फेरी, पुस्तके वाटप करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. यावर्षी पहिलीच्या वर्गात 10 हजार 952 विद्यार्थी प्रवेश घेणार आहेत. पहिली ते आठवीपर्यंतच्या 73 हजार 310 विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटपही होणार आहे. शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी ही लगबग सुरू असताना शाळांमध्ये शिक्षकांचाच पत्ता नसल्याचे दिसून येत आहेत. सुमारे 1803 पदे रिक्त असून शिक्षक कधी उपलब्ध करून देणार? असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे.
कोकणातील शाळांमध्ये शिक्षक म्हणून रूजू व्हायचे आणि काही वर्षानंतर आपापल्या जिल्ह्यात बदली करून निघून जायचे, या प्रकारामुळे जि. प. शाळांमध्ये शिकवायला कोणी नाही, अशी स्थिती आहे. तीन वर्षे कशीतरी ढकलल्यानंतर परजिल्ह्यातील शिक्षकांना जिल्हा बदली करण्याचे वेध लागतात. त्यातच नवीन भरती रखडत आहे. हीच स्थिती रायगड, सिंधुदुर्ग, पालघर या जिल्ह्यांमध्येही आहे. सातत्याने होणार्या शिक्षकांच्या जिल्हा बदल्यांमुळे जि. प. च्या शाळांची गुणवत्ता घसरत आहे. कोकणातील जिल्हा परिषदेच्या शाळा वाचवायच्या असतील, शिक्षणातील गुणवत्ता टिकवून ठेवायची असेल तर शिक्षकांची जिल्हाबदली थांबवून स्थानिक शिक्षकांना भरतीमध्ये प्राधान्य द्या, अशी मागणी मागील 15 वर्षांपासून कोकणातील डीएड्, बीएड् धारक करत आहेत. यासाठी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडपासून ते अगदी मुंबईपर्यंत येथील डीएड्, बीएड्धारकांनी उपोषणे, मोर्चे, आंदोलने केली. मात्र यावर तोडगा काढण्यात कोकणातील शिक्षणमंत्री अपयशी ठरले आहेत.
शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी पहिल्या टप्प्यात 30 हजार शिक्षकांची भरती करण्याचे आश्वासन दिले होते. जूनच्या 15 तारखेपर्यंत प्रक्रिया पूर्ण करून नवीन शिक्षक पहिल्या दिवशी शाळेत रूजू होतील, असेही ना. केसरकर यांनी माध्यमांसमोर सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात शाळांना शिक्षक मिळालेले नाहीत.