शाळेच्या पहिल्याच दिवशी 51 हजार 963 विद्यार्थांना मिळणार पुस्तके

रत्नागिरी:- जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळांचे नवे शैक्षणिक वर्ष 13 जूनपासून सुरू होत आहे. पहिल्याच दिवशी पाट्यपुस्तकांसह मोफत गणवेश देण्यात येणार आहे. त्यादृष्टीने जि.प. प्रशासनाने तयारी केली असून, गणवेशाचा जिल्ह्यातील 51 हजार 963 विद्यार्थ्यांना लाभ देण्यात येणार आहे. त्यासाठी प्रती 2 गणवेशासाठी 600 रुपये अनुदान दिले जाणार असून, 3 कोटी 11 लाख 77 हजार रुपये निधी वितरीत करण्यात आला आहे.

शालेय विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासाठी शासनाकडून शाळा स्तरावर मोफत पाठ्यपुस्तकांसह विद्यार्थ्यांच्या खात्यावर मोफत गणवेशासाठी रक्कमही जमा करण्याची कार्यवाही होते. या योजनेतून विद्यार्थ्यांच्या खात्यावर गणवेशाचे पैसे जमा करण्यासाठी बँकेत खाते उघडण्यात आलेली आहेत. त्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती व मुख्याध्यापकांच्या खात्यावर गणवेशाचे पैसे जमा केले जातात. नव्या शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होताच शाळांमध्ये 100 टक्के पटनोंदणी, 100 टक्के विद्यार्थी उपस्थिती, विद्यार्थी गळतीचे प्रमाण शुन्यावर आणण्यासाठी मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, शालेय पोषण आहार अशा योजना शाळांमध्ये राबविण्यात येत आहेत.
जिल्हा परिषदेच्या शाळांमधील सर्व मुली, अनुसूचित जाती प्रवर्गातील मुलगे, अनुसूचित जमाती प्रवर्ग मुलगे, दारिद्य्र रेषेखालील मुले यांना ‘मोफत गणवेश’ योजनेचा लाभ दिला जात आहे. आता एका शैक्षणिक वर्षासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला दोन गणवेश देण्याची तरतूद आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश योजनेपासून वंचित न ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

यापूर्वी गणवेशाची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा केली जात होती. पण त्यासाठी विद्यार्थ्यांची बँकेत खाती उघडण्याची कार्यवाही अडचणीची ठरत होती. गणवेशापासून विद्यार्थी वंचित राहू नयेत यासाठी शाळास्तरावर त्यांना लाभ देण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत. गतवर्षी शैक्षणिक सत्रावर कोरोनाचे सावट होते. आठ महिन्यानंतर शेवटच्या सत्रात पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग प्रत्यक्षात सुरु करण्यात आले होते. त्यापूर्वी ऑनलाईन अभ्यास सुरु होता. शाळा सुरु नसल्याने गणवेश वाटपाबाबत प्रश्न उभा होता. मात्र, यावर्षी सन 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी मोफत गणवेशासाठी शासनाकडून तरतूद करण्यात आली आहे.