शाळा सुरू मात्र एसटी सेवा अद्यापही बंदच

पंचायत समितीच्या सभेत वास्तव समोर; अनेक विद्यार्थ्यांना फटका

रत्नागिरी:- कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर गेले दिडवर्ष शाळांसह ग्रामीण भागातील एसटीच्या फेऱ्या बंद झाल्या होत्या. मात्र आता पुन्हा ग्रामीण भागासह शहरी भागातील शाळा सुरु झाल्या आहेत. मात्र  ग्रामीण भागातील एसटी सेवा सुरु न झाल्याचा फटका विद्यार्थ्यांना बसला आहे. रत्नागिरी तालुक्यात सुमारे 19 हजार 307 विद्यार्थ्यांपैकी केवळ 7 हजार 625 विद्यार्थी  शाळामध्ये येत आहे. ग्रामीण भागात एसटी बस सेवा सुरु नसल्यामुळे शाळांमधील विद्यार्थी संख्येत घट झाल्याचा आरोप गटशिक्षण अधिकारी सुनिल पाटील यांनी पंचायत समितीच्या मासिक सभेत केला.

पंचायत समितीच्या सभापती सौ.संजना माने यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मासिक सभेच्या आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध खात्यांचा आढावा घेण्यात आला.शिक्षण विभागाचा आढावा देता प्रभारी गटशिक्षण अधिकारी सुनिल पाटील यांनी ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते 12 वीच्या शाळा सुरु झाल्या आहे. शाळांच्या वेळापत्रकानुसार काही शाळा सकाळी लवकर तर काही शाळा दुपारी भरतात. मात्र सन 2019 मध्ये शाळांच्या वेलापत्रकानुसार एसटी महामंडळाचे वेळापत्रक  होते. सध्या ग्रामीण भागातील एसटीची सेवा बंद आहे. त्याचा थेट परिणाम शाळेतील विद्यार्थी संख्येवर होत आहे.

रत्नागिरी तालुक्यात पाचवी ते आठवी या वर्गांमध्ये १९ हजार ३०७ विद्यार्थी येणे अपेक्षित आहे. मात्र शाळेच्या वेळेत एसटीची सुविधा नसल्याने अनेक विद्यार्थी शाळांपर्यंत पोहचू शकत नाहीत. पाली पंचक्रोशीतही हिच स्थिती आहे. येथे विद्यार्थी पायपीट करत शाळेत जात आहे. त्यामुळे तेथे विद्यार्थी संख्या बर्यापैकी आहे. मात्र सध्या 7 हजार 625 विद्यार्थीच शाळेत येत आहे. उर्वरिती विद्यार्थ्यांच्या गैरहजेरीला एसटी बसचे कारण असल्याचे श्री.पाटील यांनी सभागृहात सांगितले. यावेळी सर्व भागात एसटीची सुविधा उपलब्ध करुन देण्याची सुचना सभापती सौ.संजना माने यांनी केली.

एसटी विभागाचा आढावा देताना एसटीच्या अधिकाऱ्यांनी तालुक्यातील ११२ शड्युल पैकी ८८ शड्युल सुरु आहे. आठवडाभरात सर्व शेड्युल सुरु होतील. ग्रामीण भागात ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. मात्र अपूरे कर्मचारी असल्याने फेऱ्यांचे नियोजन करताना अडथळे येत आहे. मात्र आठवडाभरात परिपूर्ण नियोजन केले जाणार असल्याचे एसटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. भविष्यात एकाही सदस्यांची तक्रार येणार आहे. असा एसटीचा प्रयत्न रहाणार असल्याचेही ते म्हणाले.

शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ मिळत नाही त्याला पर्जन्यमापक यंत्रांची ठिकाणे कारणीभूत असल्याचा आरोप सुनिल नावले यांनी केला.  तालुक्यात उंच सखल भाग असल्याने सर्वच भागाचे व्यवस्थित रिडिंग घेतले जात नाही. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय. यासाठी विमा कंपन्यांच्या प्रतिनिधीची स्वतंत्र बैठक घेण्याची मागणी श्री.नावले यांनी केली. त्यानंतर विविध कामांचा आढावा घेण्यात आला.