शाळा संच मान्यतेचा निर्णय रद्द करण्याचा ठराव

देवरुख:- संगमेश्वर तालुका शिक्षण संस्थाचालक संघाची बैठक नुकतीच शिवणे येथील दादासाहेब सरफरे विद्यालय येथे घेण्यात आली. या बैठकीत 15 मार्च 2024 चा माध्यमिक शाळा संच मान्यतेचा शासन निर्णय रद्द होणेबाबत ठाम निर्णय घेण्यात आला. त्यानुसार जिल्हा संघाला पत्र देण्यात आले आहे.

ही बैठक तालुका संघाचे अध्यक्ष राजाराम गर्दे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. माध्यमिक शाळा संचमान्यतेचा शासन निर्णय 15 मार्च 2024 च्या परिपत्रकावर विचार विनिमय करण्यासाठी संगमेश्वर तालुका शिक्षण संस्था चालक संघटनेच्यावतीने तालुक्यातील संस्था चालकांची बैठक झाली. यावेळी संघाचे तालुका सचिव प्रभाकर सनगरे, फैज पाटणकर, वांझोळेचे अनिल पंदेरे, शहाणे, कुवळेकर, तुरळचे पाटील, सुर्वे, बुरंबीचे शांताराम भुरवणे, शरद बाईत, डिंगणीचे पाटील आदी उपस्थित होते.

या शासन निर्णयामुळे तालुक्यातील दुर्गम, डोंगराळ भागात असलेल्या माध्यमिक शाळेच्या कमी होत जाणार्‍या पटसंख्यामुळे मान्यता प्राप्त शिक्षकांची संख्या शुन्यावर येत आहे. सभेत तालुक्यातील शाळांचा आढावा घेण्यात आला. सद्यस्थितीत किमान 10 शाळा शुन्य शिक्षकी होत आहेत. या 10 शाळेतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची आबाळ होणार आहे. त्यासाठी कोणत्याही प्रकारची पर्यायी व्यवस्था या शासननिर्णयामध्ये नमुद नाही. त्यामुळे सभेला उपस्थित असलेल्या संस्थाचालकांनी शासनाच्या या निर्णयाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत काही निर्णय घेतले. या निर्णयांचा पाठपुरावा जिल्हा संघटनेच्या माध्यमातून करण्यात यावा, असे ठरवण्यात आले.

शासन निर्णयाच्या संच मान्यतेच्या निकषांमुळे संगमेश्वर तालुक्यातील किमान 10 माध्यमिक शाळा शुन्य शिक्षकी होणार आहेत. हि स्थिती जिल्ह्यात अन्य तालुक्यातही निर्माण होणार असल्याने हा शासन निर्णय रद्द करण्यात यावा. हा शासन निर्णय रद्द होत नाही तोपर्यंत संचमान्यतेसाठी आवश्यक बाबीची माहिती शिक्षण विभागाला देऊ नये असाही निर्णय घेण्यात आला. हा शासन निर्णय रद्द व्हावा यासाठी प्रयत्न करण्याचे ठरवण्यात आले.