शाळा प्रवेशोत्सवाने आज होणार विद्यार्थ्यांचे स्वागत

१० हजार विद्यार्थी करणार प्राथमिक शिक्षणाचा श्रीगणेशा

रत्नागिरी:- नवीन शैक्षणिक वर्षाला आजपासून प्रारंभ होत असून, जिल्हा परिषदेच्या २ हजार ४०० शाळांची आज घंटा वाजणार आहे. त्यासाठी शाळांकडून तयारी करण्यात आली आहे. जि. प. शिक्षण विभाग सज्ज झाला आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व मुलांचे स्वागत करण्यात येणार आहे. राज्यात रत्नागिरी जिल्ह्याचा शैक्षणिक दर्जा चांगला आहे. तो तसाच टिकवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. यावर्षी १० हजार विद्यार्थी प्राथमिक शिक्षणाचा श्रीगणेशा करणार आहेत.

१६ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होत असून, शिक्षण विभागाची जय्यत तयारी सुरु आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव राबविण्यात येणार असून, शाळांचा परिसर सजविण्यासोबत पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत, प्रभातफेरी, पुस्तके वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर एकही बालक शाळाबाह्य राहणार नाही याची काळजी घेतली जात असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.

जिल्ह्यात जिल्हा परिषद तसेच अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना शासनाकडून पाठ्यपुस्तके देण्यात येतात. ही पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी मिळतील असे नियोजन करण्यात आले आहे. सरकारच्या बालभारती विभागाकडे शिक्षण विभागाने पुस्तकांची मागणी केली होती. सरकारकडून पुस्तके प्राप्त झाली असून, ही पुस्तके तालुक्याच्या गटशिक्षण अधिकाऱ्यांमार्फत केंद्रप्रमुख व केंद्रप्रमुखांच्या माध्यमातून मुख्याध्यापकांकडे सुपूर्द करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या १ लाख विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहेत.
जिल्ह्यात एकही शाळाबाह्य विद्यार्थी राहणार नाही या दृष्टीने शिक्षण विभागामार्फत पावले उचलण्यात आली आहेत. १६ जून रोजी शाळा सुरु होणार आहेत. त्यापूर्वी ६ ते १४ वयोगटातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून दूर राहू नये, यासाठी प्रवेशपात्र बालकांच्या याद्या ग्रामपंचायत व शाळा फलकावर प्रदर्शित करण्यात येणार आहेत.