रत्नागिरी:- निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या जिल्हापरिषद शाळांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजनमधून साडेसात कोटी रुपयांचा निधी मिळावा अशी मागणी अध्यक्ष रोहन बने आणि शिक्षण सभापती सुनील मोरे यांनी केली. पालकमंत्री अॅड. अनिल परब यांनी निधी उपलब्ध करुन देण्याबाबत आश्वासन दिले आहे.
निसर्ग चक्रीवादळाने जुनच्या पहिल्याच आठवडात दापोली, मंडणगडसह आजुबाजूच्या तालुक्यांना चांगला तडाखा दिला. यामध्ये घरा, गोठ्यांसह हजारो मालमत्तांचे नुकसान झाले. झाडे मुळासह उपळून गेली होती. यामध्ये जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांची छपरेच्या छपरे उडून गेली होती. चक्रीवादळाला चार महिने होत आले आहेत. या वादळात चारशेहून अधिक शाळांचे नुकसान झाले असून त्यासाठी साडेआठ कोटी रुपयांचा निधी आवश्यक आहे. तसा प्रस्ताव शासनाकडे गेलेला आहे; परंतु कोरोनाच्या परिस्थितीमुळे शासनाकडून सव्वा कोटी रुपयांचा निधी जिल्हा परिषदेला प्राप्त झालेला आहे. सध्या शाळा सुरु नाहीत, त्यामुळे भविष्यात विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ शकते. यासाठी अध्यक्ष रोहन बने यांनी काही दिवसांपुर्वी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेत शाळा दुरुस्तीसाठी अधिकाधिक निधी मिळावा अशी मागणी केली होती. त्यांनीही जिल्ह्यातील प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करु असे आश्वासन दिले होते. येत्या दोन ते तीन महिन्यात शाळा सुरु होण्याची शक्यता असल्यामुळे दुरुस्तीचा प्रश्न उद्भवू नये यासाठी अध्यक्ष बने प्रयत्नशील आहेत. बुधवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अध्यक्ष बने यांनी निधीसाठी पालकमंत्री यांच्याकडे मागणी केली आहे. शाळा दुरुस्तीला जास्त निधी दिला जाईल असे सांगितले.