रत्नागिरी:- कोवीड – 19 च्या जागतिक रोगाच्या प्रभावामुळे शाळा बंद होऊन विद्यार्थ्यांच्या नियमित शिक्षणामध्ये अडथळा निर्माण झाला असल्याने मार्चमध्ये विशेष शोध मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. परंतु सद्यस्थितीत शाळा प्रत्यक्ष सुरु झाल्याने शाळाबाहय मुलांचा शोध घेण्याच्या दृष्टीने मिशन झिरो ड्रॉपआऊड दिनांक 5 जुलै ते 20 जुलै 2022 या कालावधीत राबवयाचे आहे. 3 ते 18 वयोगटातील बालकांचे सर्वेक्षण या कालावधी मध्ये केले जाणार असून 3 ते 6 वयोगटाची जबाबदारी महिला व बाल विकास अधिकारी जिल्हा परिषद, रत्नागिरी तर 6 ते 18 वयोगटाची जबाबदारी शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांच्याकडे देण्यात आली आहे.
दिनांक 23.06.2022 च्या शासन निणर्यान्वये शाळाबाहय, अनियमित व स्थलांतरीत मुलांना शाळेच्या प्रवाहात दाखल करणेसाठी मिशन झिरो ड्रॉपआऊट राबविणेत येत आहे. शाळाबाहय मुलांची शोधमोहिम यशस्वी होण्याकरिता तालुकास्तरावर, वॉर्डस्तर समिती, केंद्र व गावस्तर समिती गठीत करण्यात आलेल्या आहेत. राज्याच्या या महत्त्वपूर्ण शैक्षणिक उपक्रमात महसूल, ग्रामविकास, नगरविकास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, महिला व बालविकास, एकात्मिक बालविकास, कामगार विभाग, आदिवासी विकास, अल्पसंख्याक विकास, सार्वजनिक आरोग्य व गृह या विभागातील अधिका-यांच्या सहभागाने शाळाबाहय, अनियमित व स्थलांतरीत मुलांना शाळेच्या प्रवाहात दाखल करणेसाठी मिशन झिरो ड्रॉपआऊट राबविण्यात येत आहे. याबाबत सर्व गटशिक्षणाधिकारी यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत.
कोवीड-19 च्या प्रादुर्भावामुळे 6 ते 18 वयोगटातील अनेक बालके शाळाबाहय झाल्याचे दिसून येत आहे. अशा बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात दाखल करण्यासाठी सदरची शोध मोहिम सुरु करण्यात येत आहे. रत्नागिरी जिल्हयामध्ये या मिशन झिरो ड्रॉप आऊटचे नियोजन करणेत येत असून याबाबतच्या सूचना सर्व क्षेत्रीय अधिकारी यांना देण्यात आलेल्या आहेत. शासन निर्णयानुसार मिशन झिरो ड्रॉप आऊट मोहिमेचे नियोजन करुन वरील कालावधीत विशेष शोध मोहिम राबविली जाणार आहे. मिशन झिरो ड्रॉप आऊटच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय समितीची सभा मा. सह अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जल्हा परिषद, रत्नागिरी मा. डॉ. इंदूराणी जाखड मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सदर सभेमध्ये या विषयाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली तसेच सदर मोहिम व्यापक स्तरावर राबवून एकही मूल शाळाबाहय राहणार नाही यासाठी सर्व यंत्रणेने प्रयत्न करावेत अशा सूचना देण्यात आल्या.
या कालावधीत 6 ते 18 वयोगटातील मुले शाळाबाहय असल्याची निदर्शनास आल्यास संबधीत तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयाशी संपर्प करावा त्याचबरोबर जिल्हा कार्यालयाशी 02352- 271006 या दूरध्वनीवर संपर्प करुन शाळाबाहय मुलांची माहिती द्यावी. जिल्हयातील 6 ते 18 वयोगटातील सर्व मुले शाळेच्या नियमित प्रवाहात दाखल करुन एकही मूल शाळाबाहय राहणार नाहीत याकरिता मा. डॉ. श्री. एन. बी. पाटील, अध्यक्ष जिल्हास्तरीय समिती तथा जिल्हाधिकारी रत्नागिरी, मा. डॉ. इंदूराणी जाखड, सहअध्यक्ष जिल्हास्तरीय समिती तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी व मा. श्री. वामन जगदाळे, शिक्षणाधिकारी (प्राथ.), जिल्हा परिषद, रत्नागिरी यांनी असे आवाहन केले आहे.