रत्नागिरी:- शाळाबाह्य, अनियमित आणि स्थलांतरीत मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ५ ते २० जुलै या कालावधीत मिशन ‘झिरो ड्रॉपआऊट’ ही मोहीम राबवण्यात येणार आहे. यामध्ये शाळांतील विद्यार्थ्यांची गळती शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
बालकांचा मोफत आणि सक्तीचा शिक्षणाचा अधिकार कायद्यांतर्गत ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकाला शाळेच्या पटावर नोंदविले जाणे, बालकांनी नियमित शाळेत येणे आणि त्याला दर्जेदार शिक्षण मिळणे हा हक्क प्राप्त झाला आहे. कोरोना महामारीच्या मागील दोन वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्रातील बर्याच जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात कुटुंबे स्थलांतरीत झाली. त्या स्थलांतरित, शाळाबाह्य बालकांचे शिक्षण थांबू नये यासाठी महाराष्ट्रात मार्च २०२१ मध्ये शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरीत मुलांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी विशेष शोध मोहीम राबविण्यात आली आहे. मिशन झिरो ड्रॉपआऊट अंतर्गत विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना शाळेत प्रवेशित करून त्यांचे गुणवत्तापूर्ण शिक्षण सुरु ठेवणे व बालकांची गळती शून्यावर आणणे हा या मिशनचा प्रमुख उद्देश आहे. ५ ते २० जुलै २०२२ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. शाळाबाह्य मुलांना दाखल करुन घेताना ढोल ताश्यांच्या गजरात दिंडी काढून स्वागत केले जाईल. शाळाबाह्य बालकांच्या शोध मोहीमेसाठी घरोघरी, बसस्थानक, रेल्वेस्थानक, सार्वजनिक ठिकाणे, बाजारतळ, वीटभट्ट्या, दगडखाणी, साखर कारखाने, बालमजूर तसेच स्थलांतरित कुटुंबांमधून करण्यात याव्यात. तसेच मागास, वंचित गटातील व अल्प संख्याक गटातील वस्तीतील बालकांची माहिती मिशनमध्ये घेण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील सर्व खेडी, गांव, वाडी, तांडे, पाडे व शेतमळ्यात,जंगलात वास्तव्य करणार्या पालकांच्या शाळाबाह्य बालकांचा सर्वेक्षणामध्ये समावेश करण्यात येणार आहे. महिला बालविकासाअंतर्गत बालगृह, निरीक्षण गृह, विशेष दत्तक संस्था यामधील बालकांचाही या मिशनमध्ये समावेश करण्यात यावा अशा सुचना शिक्षण विभागाकडून प्राप्त झाल्या आहेत.