शालेय पोषण आहार 15 मार्चपासून पुन्हा सुरू

रत्नागिरी:- कोरोनाच्या पार्श्वभूूमीवर गेले दोन वर्ष बंद असलेल्या शाळा गेल्या महिन्यात पुन्हा सुरू झाल्या आहेत. शाळा सुरू झाल्या असल्या तरी विद्यार्थ्यांना मिळणारा शालेय पोषण आहार सुरू झाला नव्हता. अखेर हा आहार 15 मार्चपासून सुरू केला जाणार आहे. याचा लाभ जिल्ह्यातील 1 लाख 32 हजार 660 विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

शालेय पोषण आहार योजनेच्या अंमलबजावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून वारंवार मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या होत्या; मात्र शाळांमधील सर्व विद्यार्थी पोषण आहारापासून गेले नऊ महिने वंचित होते. कोरोनामुळे मागील दोन शैक्षणिक वर्षात शिकवणी ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आली. जुन महिन्यात नवीन ठेकेदार निश्चित करुन पोषण आहारासाठी आवश्यक साहित्य त्या-त्या शाळांना पुरवले जाते; मात्र यंदा ठेकेदारच निश्चित न केल्यामुळे गोंधळ झाला. शासनाने ऑगस्ट ते फेब्रुवारी 2022 अशा सात महिन्यांचा कोरडा आहार त्यामध्ये तांदुळ व धान्यही देणार असल्याचे शासनाने परिपत्रकाद्वारे घोषित केले. त्यानंतर नऊ महिने झाले तरीही आहार देण्यासंदर्भात कार्यवाही झालेली नाही. तिसर्या लाटेचा प्रभाव ओसरल्यानंतर शै. कामकाज पुन्हा सुरु करण्यात आले होते. परंतु आहार वाटप करण्याबाबत  शासनाकडून कोणतीच पावले उचलण्यात आली नव्हती. त्यामुळे पालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती. याची गंभीर दखल घेत शिक्षण विभागाने 15 मार्चपासून पोषण आहाराचे वितरण करण्याच्यादृष्टीने पावले उचलली आहेत. राज्यातील प्रत्येकी जिल्ह्यात आहार किती विद्यार्थ्यांना दिला जाणार याची माहिती गोळा केली जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 1 लाख 32 हजार 660 विद्यार्थी आहे. त्यामध्ये 1 ते 5 वी चे 68 हजार 976 आणि 6 ते 8 वीचे 63 हजार 684 विद्यार्थी आहेत. लहान मुलांना 100 ग्रॅम आणि मोठ्या गटातील मुलांना 150 ग्रॅम तांदूळ असे नियोजन केले जाते. त्यानुसार माहिती शासनाकडे सादर करण्यात आली आहे.

पोषण आहाराबरोबर गेल्या वर्षभरापासून मधील 2 महिन्यांचा अपवाद वगळता पोषण आहार तयार करणार्‍या मदतनिसांचे वेतनदेखील शासनामार्फत दिले नाही. पुरवठ्याचे आदेश स्थानिक पातळीवर असून वरिष्ठ पातळीवरूनच झाले नसल्याचे जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.