रत्नागिरी:– रत्नागिरी शहर आणि परिसरात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत असताना आता शहर पोलीस स्थानकात देखील कोरोनाने शिरकाव केला आहे. शहर पोलीस स्थानकातील एका महिला पोलिस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे.
मंगळवारी रात्री रत्नागिरी तालुक्यातील 12 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे अहवाल प्राप्त झाले. या अहवालात शहर पोलीस स्थानकातील एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह म्हणून प्राप्त झाला आहे. पोलीस दलात काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाकडून घेण्यात आला होता. यानुसार शहर पोलीस स्थानकातील काही कर्मचाऱ्यांनी स्वॅब दिला. यात एका महिला कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. या कर्मचाऱ्याला कोरोनाची कोणतीच लक्षणे नसताना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान मंगळवारी रात्री आलेल्या अहवालानुसार रत्नागिरी शहर आणि परिसरात 12 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यात वाटद खंडाळा परिसरातील 2, झारणी रोड येथील 1, जुना माळनाका येथील डॉक्टर, फिनॉलेक्स कॉलनीतील 1, आरोग्य मंदिर येथील 2, नाटे येथील 1, सिविल कर्मचारी 1 आणि खासगी रुग्णालय येथील 1 डॉक्टर आणि 1 नर्स कोरोना बाधित सापडली आहे.