रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यात कोरोनाचे धुमशान सुरूच असून शहरानजिकच्या बाणखिंड परिसरात एकाच दिवशी 6 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. बाणखिंड परिसरात रुग्ण सापडण्याची ही पहिलीच घटना असून या परिसरातील रहिवाशांची चिंता अधिकच वाढली आहे.
रत्नागिरी तालुक्यात कोरोनाचा धुमाकूळ चांगलाच सुरू झाला आहे. दरदिवशी मोठ्या संख्येने रुग्ण पॉझिटीव्ह सापडत आहेत. गुरुवारी सायंकाळी 4 वाजेपर्यंत 60 रुग्ण रत्नागिरी तालुक्यात पॉझिटीव्ह सापडले होते. रात्री उशिरा आणखी 20 रुग्ण पॉझिटीव्ह सापडले आहेत. त्यामुळे गुरुवारी रत्नागिरीत 80 रुग्ण कोरोनाबाधित सापडले आहेत.
शहरानजिकच्या शिरगाव येथील 6 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यातील 6 रुग्ण हे बाणखिंड परिसरातील असून बाणखिंड परिसरात कोरोनाचा शिरकाव झाल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे रेल्वे कॉलनी, कोळंबे, मेंटल हॉस्पीटल, एमएससीबी कॉलनी, नाचणे, कारवांचीवाडी, मारुती आळी, बाजारपेठ, शांतीनगर, सुभाष रोड, परटवणे आदी परिसरात नवे रुग्ण सापडले आहेत.
गुरुवारी रात्री उशिरापर्यंत तब्बल 80 रुग्ण रत्नागिरी तालुक्यात पॉझिटीव्ह सापडले आहेत. हा आकडा वाढण्याची शक्यता असून सध्या रत्नागिरी तालुका हा हॉटस्पॉट म्हणून ओळखला जात आहे. प्रशासनानेदेखील योग्य ती पावले उचलली असून ग्रामीण भागात कोरोनाबाबत जनजागृतीसाठी विशेष उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत.