शहरात एक प्रभाग, दोन नगरसेवकांची वाढ; 23 मे पर्यंत सुनावणी प्रक्रिया 

रत्नागिरी:- रत्नागिरी नगरपालिकेत एक प्रभाग वाढलेला असून या बदललेल्या रचनेविषयी प्रशासनाकडे अकरा हरकती प्राप्त झालेल्या आहेत. यामध्ये काही जुन्या अर्जांचाही समावेश आहे. यावर 23 मे पर्यंत जिल्हाधिकार्‍यांकडे सुनावणी होणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास राज्य निवडणुक आयोगाकडून हिरवा कंदिल मिळाल्यानंतर पुढील कार्यवाहीला आरंभ झाला. यापुर्वी निवडणुक आयोगाच्या सुचनेनुसार प्रभाग रचना नव्याने करण्यात येणार होती. त्यावर कार्यवाही केली जात होती; परंतु ही प्रक्रिया स्थगित केली गेली. त्यानंतर पुन्हा ही प्रक्रिया सुरु झाली असून नव्याने केलेल्या प्रभाग रचनेसंदर्भात हरकती मागवण्यात आल्या होत्या. त्याची मुदत संपूष्टात आली असून आतापर्यंत 11 हरकती नोंदविण्यात आल्या आहेत. यामधील काही हरकती या मार्चपुर्वीच्या असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. जिल्हाधिकार्‍यांकडे सुनावणी घेतल्यानंतर त्याचा अहवाल राज्य निवडणुक आयोगाकडे सादर करावयाचा आहे. 6 जुनला प्रभागाची अंतिम यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. रत्नागिरी नगरपालिकेतील एक प्रभाग वाढला असून दोन नगरसेवकांची भर पडली आहे. जुन्या यादीप्रमाणे पंधरा प्रभाग आणि तिस नगरसेवक होते. आता सोळा प्रभाग आणि 32 नगरसेवक होणार आहेत. दोन जागा वाढल्यामुळे इच्छुकांच्या भाऊगर्दीतही वाढ होणार आहे.