शहरातील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी रनप कर्ज काढण्याच्या तयारीत? 

काँक्रिटीकरणासाठी ९७ कोटीचा निधी, रनपच्या १५ टक्केचा घोळ

रत्नागिरी:- राज्य नगरोत्थान योजनेतून शहरातील मुख्य रस्त्यांसह एकूण १० रस्त्यांसाठी शासनाने ९७ कोटी रुपये मंजूर केले आहेत. वारंवार रस्ते खराब होत असल्याने उद्योगमंत्री उदय सामंत काँक्रिटीकरण्याच्यादृष्टीने आग्रही होते. त्यांच्या पाठपुराव्यामुळे शहराला हा निधी मिळाला आहे; परंतु मंजूर निधीपैकी १५ टक्के रक्कम म्हणजे १४ कोटी ५५ लाख पालिकेला भरावे लागणार आहेत. पालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने पालिका एवढे पैसे कसे उभा करणार हा प्रश्न असून पालिकेचा हफ्ता भरण्यासाठी पालिका कर्ज काढण्याच्या तयारीत असल्याची खात्रीलायक माहिती आहे. 

गेल्या काही वर्षांपासून रत्नागिरी शहरातील प्रमुख रस्त्यांवर दरवर्षी खर्च करावा लागत आहे. दोन वर्षे नव्हे तर वर्षभरही रस्ता टिकत नाही, अशी परिस्थिती आहे. अतिवृष्टीचे कारण देऊन याला दरवर्षी बगल दिली जाते. दरवर्षी शहर आणि परिसरात साडे तीन हजार मिमीच्या वर पाऊस पडतो. त्यामुळे त्याचा विचार करून ठेकेदारांनी त्या दर्जाचे रस्ते बनवण्याची गरज आहे; परंतु तसे होताना दिसत नाही. त्यात शहरामध्ये सुधारित पाणीयोजनेच्या कामासाठी रस्त्यांची खोदाई केल्याने शहरातील रस्त्यांची वाताहात झाली. ठिकठिकाणी डागडुजी केली गेली आहे; पण नवीन रस्ते करणे आवश्यक बनले आहे. रस्त्यांवर वारंवार कोट्यवधीचा निधी खर्च होतो आणि तो पुन्हा पाण्यात जातो.

खराब रस्त्यांमुळे जनतेत संतापाचे वातावरण आहे. याचा विचार करता उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नगरोत्थानमधून ९७ कोटी रुपये मंजूर केले आहेत. यातून १० रस्त्यांची कामे केली जाणार आहेत.
परंतु, गेल्या काही महिन्यांपासून पालिकेवर मोठा आर्थिक बोजा असल्याने पालिकेची आर्थिक स्थिती बेताची बनली आहे. त्यामुळे या ९७ कोटींपैकी पालिकेला १५ टक्के म्हणजे १४ कोटी ५५ लाखाचा निधी उभा करावा लागणार आहे. या स्थितीमध्ये पालिकेला हे शक्य नसले तरी प्रशासनाकडून काही हालचाली सुरू झाल्या आहेत. स्वनिधी किंवा कर्ज असे दोन पर्याय पालिकेपुढे आहेत. त्यापैकी एकाचा वापर करून हे विकासकाम करून घेतले जाणार आहे.  त्यामुळे शहरातील हे काँक्रिटीकरण होणार हे निश्चित झाले आहे. या योजनेखाली करण्यात येणाऱ्या १० रस्त्यांपैकी दांडा फिशरीज ते साळवी स्टॉपपर्यंतच्या ८.२५ कि.मी. रस्त्यासह मारूती मंदिर ते मजगावकडे जाणारा रस्ता, मारूती मंदिर ते नाचणेकडे जाणारा रस्ता, मंगळवार बाजार ते नाचणे ग्रामपंचायतीपर्यंतचा रस्ता आणि माळनाका ते थिबा पॅलेसकडे जाणारा रस्ता याचा समावेश आहे. या रस्त्यांसाठी ९६ कोटी ९९ लाख ९० हजार २९९ रुपये मंजूर झाले आहेत.