रनप सभेत नगराध्यक्षांची माहिती; व्हिक्टोरिया क्लब ताब्यात घेणार
रत्नागिरी:- सुधारित पाणी योजना आणि सीएनजी गॅसची लाइन टाकण्यासाठी सुरू असलेल्या खोदकामामुळे शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत. नागरिकांना एवढीच विनंती आहे की, आणखी एक महिने हा त्रास सोसा. 5 कोटीचा निधी उपलब्ध आहे. खोदाईचे काम पूर्ण झाल्यानंतर शहरातील सर्व रस्ते चकाचक करू, असे आश्वासन नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत दिले. तसेच रामआळीतील अतिक्रमण हटविणे, व्हिक्टोरिया क्लब ताब्यात घेण्याचे, पालिकेच्या इमारतींवर पालिकेचे नाव टाकण्याचे आदेश त्यांनी दिले.
पालिकेची मासिक सर्वसाधारण सभा आज नगराध्यक्ष साळवी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे यांच्यासह सर्व खातेप्रमुख, सभापती, नगरसेवक उपस्थित होते. विषयपत्रिकेच्या वाचनाला सुरवात करण्यापूर्वी नगराध्यक्ष साळवी यांनी सभागृहाला निवेदन केले. ते म्हणाले, शहरामध्ये सुधारित पाणीयोजनेचे पाइपलाइन टाकण्याचे काम 80 टक्के पूर्ण झाले आहे तसेच सीएनजी गॅस लाइनही टाकली जात आहे. यामुळे शहरातील रस्त्यांची अवस्था वाईट झाली आहे. रस्ते आहेत की पायवाटा अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे; मात्र ही वस्तुस्थिती नाही. खोदकाम केलेल्या कंपन्यांवर रस्त्याची लेव्हल करणे बंधनकारक आहे. ठेकेदारांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. जिल्हाधिकार्यांनीही योजना पूर्ण होत नाही तोवर रस्ते करू नयेत, अशा सूचना केल्या आहेत. शासनाचेही तसे आदेश असल्याने काम थांबले आहे. उदय सामंत यांच्या प्रयत्नांमुळे 5 कोटी रुपये पालिकेला मिळाले आहेत. त्यामुळे सर्व प्रभागातील रस्ते चकाचक केले जातील.