शहरातील रस्ते, नळपाणी पुरवठा योजना पूर्णत्वाच्या मार्गावर: ना. सामंत

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील रस्ते व नळपाणी पुरवठा योजना लवकरच पूर्ण होणार आहे. दोन्हीसाठी आवश्यक निधी नगर पालिकेला प्राप्‍त झाला आहे. ऑगस्टच्या शेवटपर्यत रस्त्यांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण करुन, पाऊस संपल्यावर तात्काळ रस्ते पूर्ण केले जाणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

रत्नागिरी नगर पालिकेतील पाणी योजना, रस्त्याविषयी जनतेमधून व विरोधकांकडून मोठी ओरड होत आहे. या पार्श्‍वभूमीवर ना. सामंत यांनी नगर पालिकेत जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी नळपाणी पुरवठा योजना येत्या दीड-दोन महिन्यात पूर्ण होईल असे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे रस्त्याची सुमारे 15 कोटीची कामे मंजूर झाली असून 10 कोटीचा निधी नगर पालिकेकडे वर्ग करण्यात आला आहे. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापर्यत रस्त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण केल्या जाणार असून, पाऊस संपल्यानंतर रस्त्याची कामे तात्काळ केली जाणार आहेत. त्याचप्रमाणे शहरात उभारले जाणारे तारांगणाचे कामही प्रगतीपथावर असल्याचे ना. सामंत यांनी सांगितले.
शहरातील प्रमुख सहा रस्ते हे काँक्रिटचे करण्याबाबत 83 कोटीचा डिपीआर नगर पालिकेने बनवण्यात आला आहे. ना. एकनाथ शिंदे यांनी याला सहमती दर्शवली आहे. राज्य नगरोत्थानची बैठक झाल्यावर रस्त्याला 83 कोटीचा निर्णय होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. घनकचरा प्रकल्पाचे टेंडरही लवकरच निघेल असे त्यांनी स्पष्ट केले. सव्वावर्षात रत्नागिरी नगर पालिकेला 50 ते 60 कोटी रुपये आणण्यात यश आले आहे.
लसीकरणामध्येही नगरपालिकेने आघाडी घेतली आहे. शहरातील दोन हजारहून अधिक ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. सध्या 18 ते 44 वर्षामधील तरुणांचे लसीकरण थांबवण्यात आले आहे. या तरुणांच्या लसीकरणासाठी आमदार निधीतून 25 लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला असल्याचे ना. सामंत यांनी सांगितले. यावेळी नगराध्यक्ष बंड्या साळवी, सर्व नगरसेवक उपस्थित होते.