रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील मुख्य रस्त्यांसह विविध भागात मोकाट गुरांचा त्रास नागरिकांना मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत आहे. याबाबत पालकमंत्री उदय सामंत यांनी लक्ष घातले आहे. ही मोकाट गुरे पकडून ती चंपक मैदानावर बांधण्याचा प्रयोग केला जाणार आहे. चारहीबाजूंनी त्याला बॅरेकेट लावून प्रशासन त्यांच्यासाठी चारापाण्याची व्यवस्था करणार आहे.
यातील दूभती जनावरे शेतकर्यांना मोफत दिली जाणार आहेत. मात्र या गुरांचा वापर शेतकरीच करीत असल्याबाबत पोलिस प्रशासनाचे लक्ष राहणार असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी उपस्थित होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, मोकाट गुरांमुळे वाहनधारक आणि नागरिकांना होणारा उपद्रव थांबवण्याच्या दृष्टीने ही उपाययोजना केली जाणार आहे. मुख्य रस्त्यांबरोबर अंतर्गत रस्त्यावर या गुरांचा कळपच्या कळप ठाण मांडून बसलेला असतो. यामुळे वाहतूक कोंडी होते. काहीवेळा अचानक गुरे रस्त्यात येऊन अपघात झाले आहेत, असे अनेक प्रकार घडूनसुद्धा पालिकेने याकडे दुर्लक्ष केले. पालिकेकडे कोंडवाडा नाही, म्हणून गुरांना पकडण्याकडे दुर्लक्ष केले. तसेच त्यांना शहराबाहेर हाकलविण्याचाही प्रयत्न झाला. परंतु तो देखील तोकडा पडला. नागरिकांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी ही बाब पालकमंत्री उदय सामंत यांच्या निदर्शनास आणून दिली.
ना. सामंत म्हणाले, मोकाट गुरांबाबत आम्ही एक प्रयोग म्हणून काही संस्थांमार्फत ही गुरे पकडून चंपक मैदानात बांधणार आहोत. चारही बाजूने बॅरिकेट लावून त्यांना बांधून ठेवले जाईल. त्यांची देखभाल म्हणून चारा-पाणी दिले जाणार आहे. पंधरा दिवसांत आम्ही आवाहन करून ज्यांना गुरे सांभाळण्यासाठी हवी आहेत, त्या शेतकर्यांना दिली जाणार आहेत. परंतु ती कत्तल खाण्यात जाणार नाहीत, याची खबरदारी घेतली जाणार आहे. ज्यांना गुरे दिली जाणार आहेत. त्यांच्यावर पोलिस प्रशासनाचे लक्ष राहणार आहे. जर त्याठिकाणी गुरांचा मालक आला तर त्याच्यावर काय कारवाई करायची? याच्या सूचनाही पोलिस अधीक्षकांना दिल्या असल्याचे ना. उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.









