शहरातील खड्डे सकाळी भरले, दुपारी उखडले 

दर्जाहीन कामामुळे नागरिकांचा प्रचंड रोष 

रत्नागिरी:- काँग्रेसने श्रमदानातून शहरातील रस्त्यात पडलेले खड्डे भरण्याचे अनोखे आंदोलन करून पालिकेच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले. त्यात काल दहीहंडी उत्सव असल्याने पालिकेने तात्पुरती मलमपट्टी म्हणून शहरातील खड्डे भरण्याची मोहीम हाती घेतली; मात्र खड्ड्यांमधील पाणी न काढता त्यामध्येच डबर आणि काही ठिकाणी सिमेंटमिश्रित वाळून टाकली जात होती. या थातुरमातूर कामावर पुन्हा पाणी फिरून पालिकेचा हा खर्चही वाया गेल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी दिली.

शहरात सर्वच रस्ते चार महिन्यांपूर्वी गुळगुळीत करण्यात आले होते. त्यासाठी २७ कोटी रुपये खर्च करण्यात आले; परंतु चार महिन्यातच या रस्त्यांची चाळण झाली आहे. या दर्जाहीन कामामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून जनतेच्या पैशाचा प्रचंड अपव्यय सुरू असल्याचा आरोप काँग्रेसचे माजी उपनगराध्यक्ष बाळा मयेकर यांनी केला. पालिका प्रशासनाला जाग आणण्यासाठी त्यांनी बाळा मयेकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने श्रमदानातून खड्डे भरण्याचे आंदोलन केले. या आंदोलनाची चांगलीच चर्चा झाली. आंदोलक खड्डे भरत असताना शहरवासीयांच्या प्रचंड संतप्त प्रतिक्रिया येत होत्या. या आंदोलनाची दखल पालिकेने घेतली आहे. त्यात आज दहीहंडी उत्सव असल्याने पालिकेने शहरातील खड्डे भरण्याची मोहीम हाती घेतली आहे.
अनेक ठिकाणी डबर टाकून खड्डे भरण्यात आले तर काही ठिकाणी सिमेंटमिश्रित वाळू टाकून खड्डे भरण्याचे काम सुरू होते; परंतु त्याही ठेकेदाराने हे काम थातुरमातुर केल्याचे दिसत होते. खड्ड्यातील पाणी न काढता खड्डे भरले जात होते. जनतेच्या डोळ्यात धुळफेक करणाऱ्या या कामावरही नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या; मात्र या कामावर अंकुश ठेवण्यासाठी कोणीही नव्हते.