शशिकांत वारीसे यांचा घातपातच; सरकारकडून विधान परिषदेत कबुली

रत्नागिरी:- जिल्ह्यातल्या राजापूरमधील पत्रकार शशिकांत वारिसे यांचा घातपात झाल्याचे सरकारने विधानपरिषदेत लेखी उत्तरात म्हटले आहे. रिफायनरीविरोधात बातमी प्रकाशित केल्याने त्यांची हत्या झाल्याची शंका विरोधी पक्षांनी व्यक्त केली होती. यावर सरकारने विधानपरिषदेत लेखी उत्तर देताना शशिकांत वारिसे यांचा अपघात घडवून आणल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी सध्या एसआयटी चौकशी सुरू आहे.

विधान परिषदेत विरोधकांनी शशिकांत वारिसे प्रकरणी लेखी प्रश्न सरकारला विचारला होता. यावर लेखी उत्तरात शशिकांत वारिशे यांची हत्या जाणीवपूर्वक घडवून आणण्यात आली आहे. नाणार परिसरात वाहन अपघात घडवून आणल्याची अखेर सरकारची कबुली दिली आहे. सध्या या प्रकरणी एसआयटीची चौकशी सुरू असल्याची देखील सरकारकडून लेखी उत्तरात माहिती देण्यात आली आहे.

शशिकांत वारिसे यांचा ६ फेब्रुवारी रोजी दुपारी दुचाकीने जात असताना त्यांच्या वाहनाला पेट्रोल पंपासमोर एका वाहनाने धडक दिली होती. त्यात गंभीर जखमी झालेल्या वारिसे यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यानंतर त्यांचे निधन झाले होते. शशिकांत वारिसे यांना पंढरीनाथ अंबेरकर याने अपघात घडवून हत्या केल्याचा आरोप केला जात आहे.

आरोपी पंढरीनाथ आंबेरकर आहे तरी कोण?
शशिकांत वारिसे यांच्या हत्याप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी पंढरीनाथ आंबेरकर हा रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यातील कुंभवडे या गावचा रहिवासी आहे. सुरुवातीच्या काळात छोटासा आंबा व्यापारी असलेला पंढरीनाथ आंबेरकर 2017 सालानंतर मात्र आर्थिकदृष्टीने सक्षम झाला. कोकणात नाणार रिफायनरी प्रकल्पाची घोषणा झाली आणि त्यानंतर त्याने काही जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार सुरु केले. स्वतः देखील काही जमिनी खरेदी केल्या. यामध्ये त्याला आर्थिक नफा चांगलाच झाला. दरम्यानच्या काळात टूर्स अँड ट्रॅव्हल्स आपला व्यवसाय सुरु केला आणि वाढवला. नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द झाल्याची घोषणा बारसू आणि सोलगाव येथे झाली. या ठिकाणी देखील आंबेरकर याने जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार सुरु केले. त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची चौकशी एसआयटीमार्फत होणार असल्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिले होते. वारिसे यांच्या मृत्यूची चौकशी एसआयटीमार्फत करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. त्याप्रमाणे मृत्यूच्या पाच दिवसानंतर म्हणजे 11 फेब्रुवारी 2023 ला देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले होते.