वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्तीवरून जोरदार खडाजंगी 

रत्नागिरी:- तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकार्‍यांच्या नियुक्तीवरून पंचायत समितीची बैठक गाजली. कोतवडे पीएचसीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. लेले पावस पीएचसीला काम करत आहेत. तशी तोडी नियुक्ती जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांनी दिली. मात्र लेखी दिल्याची खोटी माहिती आरोग्य अधिकारी देत आहेत. विनाकारण त्यांना जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांनी 2 मेमो दिले. जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांच्या या भोंगळ कारभार समाचार घेत डॉ. लेले यांची कोतवडे येथे नियुक्ती देऊन पावसला कायम अधिकारी द्यावा, अशी मागणी सदस्य गजानन पाटील यांनी सभागृहात केली. 

विषयपत्रिकेवरील विषयांचे खातेनिहाय वाचन सुरू होते. आरोग्य विभागाचा आढावा तालुका आरोग्य अधिकारी श्री. गावडे यांनी दिली. गजानन पाटील यांनी कोतवडे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रीतसर नियुक्ती झालेले डॉ. अनिरुद्ध लेले यांच्या चुकीच्या नियुक्तीचा विषय सभागृहापुढे ठेवला. कोतवडे ही 28 गावांचे आरोग्य केंद्र आहे. तेथे एकच आरोग्य अधिकारी होता. डॉ. लेले यांची तिथे नियुक्ती झाले आहे. मात्र पावस प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कांबळे 15 दिवसाच्या रजेवर गेल्यामुळे डॉ. लेले यांची पावसला तोंडी नियुक्ती केली. ते प्रामाणिक बारा तास काम करतात. मात्र ते निवासी वैद्यकीय अधिकारी असल्याचे सांगून रात्री पावस येथे राहात नाहीत, म्हणून त्यांच्याविरोधात तक्रारी झाल्या. जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांनी 2 वेळा त्यांना मेमो काढला. हे चुकीचे आहे, कोविड काळात डॉक्टर मिळत नाहीत. चांगले काम करणार्‍या डॉक्टरला जिल्हा आरोग्य अधिकारी अशी चुकीची वागणूक देत आहेत.

तालुकाअधिकार्‍यांनी सांगावे की डॉ. लेलेंची तोंडी की लेखी नियुक्ती आहे. यावर ते गडबडले. लेखी आदेश असल्याचे त्यांनी बिचकत सांगितले. यावर श्री. पाटील म्हणाले, तुम्ही साफ खोट सांगताय. सभापती तुम्ही आरोग्य अधिकार्‍यांना आणि डॉ. लेलेना फोन करा. बाप दाखवा, नाही तर श्राद्ध घाला, तुम्हाला वस्तुस्थिती लक्षात येईल. जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांचा भोंगळ कारभार सुरू आहे, असा आरोप श्री. पाटील यांनी केला.

पावसला प्राथमिक आरोग्य केंद्रालाही कायमचा वैद्यकीय अधिकारी मिळावा, याची मागणी सदस्य सुनील नावले यांनी केली. डॉ. कांबळे 15 दिवस सांगून 2 महिने रजेवर आहेत. ते हजर होणार की नाही, ती माहिती द्या. यावरून दोन्ही सदस्यांनी आम्हाला कायमचे वैद्यकीय अधिकारी मिळण्याशी मतलब. सभापतींनी याबाबत बैठक घेऊन डॉ. लेले यांना कोतवडे येते नियुक्तीच्या ठिकाणी हजर करावे आणि पावसलाही कायमचा वैद्यकीय अधिकारी द्यावा, अशी मागणी पाटील यांनी केली.