वेळ पडल्यास अपक्ष लढणार: सहदेव बेटकर

रत्नागिरी:- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री उदय सामंत यांनी आपल्याला जिल्ह्याचे संपर्कप्रमुख नेमले आहे. आपण कधीही ठाकरे गटात जाणार असल्याचे बोललो नव्हतो. मात्र 2024मध्ये गुहागर किंवा चिपळूण-संगमेश्वरमधून लढण्याची आपली इच्छा आहे. तिकीट न मिळाल्यास समाजासाठी आपण अपक्षही लढण्याची तयारी ठेवली असल्याचे माजी शिक्षण सभापती सहदेव बेटकर यांनी सांगितले.

पालकमंत्री उदय सामंत यांच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाप्रमुख राहूल पंडीत उपस्थित होते. सहदेव बेटकर हे ठाकरे शिवसेनेते जाणार असल्याच्या चर्चेने शिंदे गटात खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर बेटकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पालकमंत्री उदय सामंत यांनी कुणबी भवनासाठी 75 लाखाचा निधी दिला आहे. तर बाळासाहेबांच्या शिवसेनेच्यावतीने 11 लाखाचा निधी दिला आहे. पालकमंत्र्यांनी आतापर्यंत 1 कोटी 35 लाखाचा निधी दिला असल्याचेही त्यांनी सांगितले.

आपण पालकमंत्र्यांच्या कुटुंबातील असून, ते आपल्याला भावासारखे आहेत. त्यामुळे ते व मुख्यमंत्री बहुजन समाजाला नक्कीच संधी देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गुहागरमध्ये यापूर्वी आपण चांगली लढत दिली आहे. गुहागरप्रमाणेच चिपळूण-संगमेश्वरमधील जनताही आपल्या पाठीशी आहे. तेथील समाजही सोबत आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणांपैकी एका ठिकाणी आपल्याला संधी मिळावी अशा भावना सहदेव बेटकर यांनी व्यक्त केली. समाजाने आग्रह केला तर आपण अपक्षही निवडणूक लढायची तयारी केली असल्याचे सांगतानाच, आपल्याला पालकमंत्री सामंत योग्य न्याय देतील असा विश्वास व्यक्त केला.