राजापूर:- तालुक्यातील आंबोळगड येथे सर्पदंश झालेल्या एका महिलेचा वेळेवर उपचार न मिळाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. सुविधा सुगंध वाडेकर ( ४०) असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १७ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास सुविधा वाडेकर घराशेजारी काम करत असताना त्यांना विषारी सापाने दंश केला. त्यानंतर तातडीने त्यांचे शेजारी श्रीपाद करगुटकर आणि इतर ग्रामस्थांनी त्यांना जवळच्या जैतापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, ग्रामस्थांचा आरोप आहे की, या वेळी आरोग्य केंद्रात कोणतेही कर्मचारी किंवा डॉक्टर उपलब्ध नव्हते.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ग्रामस्थांनी त्यांना तातडीने धारतळे प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवले. तेथे प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारांसाठी रत्नागिरी येथे नेण्याचा सल्ला दिला. मात्र, यात बराच वेळ गेल्याने आणि वेळेवर योग्य उपचार न मिळाल्याने रत्नागिरी येथील रुग्णालयात सुविधा वाडेकर यांचे निधन झाले, असे ग्रामस्थांनी सांगितले.
ग्रामस्थांनी आणखी एक गंभीर आरोप केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, जैतापूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचाऱ्यांनी महिलेला चावलेला साप ओळखण्यासाठी तो घेऊन येण्यास सांगितले होते. सर्पदंशानंतर तातडीने वैद्यकीय मदत मिळणे आवश्यक असताना, अशा प्रकारच्या प्रतिसादाने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
या दुर्दैवी घटनेनंतर आंबोळगड आणि परिसरातील ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात वेळेवर आणि योग्य उपचार न मिळाल्यामुळेच महिलेचा मृत्यू झाला, असा आरोप त्यांनी केला आहे. या निष्काळजीपणाची तातडीने चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
तालुक्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांची अवस्था बिकट असून ती व्हेंटिलेटरवर असल्यासारखी झाली आहे, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी या गंभीर बाबीकडे लक्ष देणे गरजेचे असताना, आता या दुर्दैवी घटनेनंतर तरी ग्रामपंचायत स्तरापासून ते आमदारांपर्यंत सर्वच लोकप्रतिनिधी किती गांभीर्याने दखल घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या घटनेमुळे आरोग्य यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.