लांजा:- तालुक्यातील वेरवली खुर्द येथील एका ६२ वर्षीय वृद्धाचा शिडीवरून पाय घसरून पडल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. उदय जयकृष्ण महाराव (वय ६२, रा. वेरवली खुर्द, ता. लांजा, जि. रत्नागिरी) असे मृत वृद्धाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उदय महाराव हे २३ जून रोजी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास आपल्या घराच्या मागील बाजूस असलेल्या शिडीवरून उतरत असताना त्यांचा पाय घसरला. यात ते खाली पडून त्यांच्या डोक्याच्या मागील बाजूस गंभीर दुखापत झाली.
त्यांना तातडीने उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने १२ जुलै रोजी रात्री ८.५४ वाजता त्यांना पिंपरी, पुणे येथील वायसीएम हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान १३ जुलै रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास डॉ. अमित वाघ यांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे वेरवली खुर्द गावात शोककळा पसरली आहे. लांजा पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.