वेगवान वार्‍यासह मुसळधार पावसाने जिल्ह्याला झोडपले

रत्नागिरी:- वेगवान वार्‍यासह जिल्ह्यात मुसळधार पावसाने मंगळवारीही (ता. 9) धुमाकुळ घातला आहे. किनारी भागात वादळी वारे वाहत होते, त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण होते. सकाळच्या सत्रात पावसाने उसंत घेतल्यामुळे वाशिष्ठी, जगबुडी, बावनदी, काजळी, अर्जुना नदीची पाणी पातळी कमी झाली होती. चांदेराई बाजारपेठेत दोन फुट पुराचे पाणी तसेच होते.

जिल्ह्यात मंगळवारी (ता. 9) सकाळी 8.30 वाजेपर्यंतच्या चोविस तासात 97.97 मिलीमीटर सरासरी पाऊस झाला. मंडणगड 107.10, दापोली 75.10, खेड 116.90, गुहागर 60.60, चिपळूण 100, संगमेश्वर 104.50, रत्नागिरी 114.40, लांजा 138.10, राजापूर 65 मिमी पाऊस झाला. 1 जुन पासून आतापर्यंत 2148 मिमीची नोंद झाली आहे. सोमवारी सायंकाळनंतर मुसळधार पावसाबरोबरच वेगवान वारेही वाहू लागले होते. वार्‍यामुळे समुद्र खवळलेला होता, अजस्त्र लाटाही किनार्‍यावर फुटत होत्या. मच्छीमारांनी नौका बंदरावरच उभ्या करुन ठेवल्या आहेत.  काजळी नदीला आलेल्या पुराचे पाणी चांदेराई बाजारपेठेत चोविस तासाहून अधिक काळ होते. शंभरहून अधिक दुकानात पाणी शिरले होते. पुराची शक्यता लक्षात घेऊन व्यावसायिकांनी वेळीच साहित्य सुरक्षित ठीकाणी हलवल्यामुळे मोठे नुकसान झालेेले नाही. राजापूर तालुक्यातील अर्जुना नदीचा पुरही ओसरला आहे. लांजा तालुक्यात विलवडे येथे मुचकुंदी नदीच्या पुराचे पाणी शाळेच्या इमारतीच्या तळमजल्यापर्यंत पोचले. त्या शाळेतील 22 मुलांसह दोन शिक्षकांनी वरच्या मजल्यावर आसरा घेतला होता. पुराचे पाणी ओसरल्यामुळे भातशेतातील पाणीही कमी झाले आहे.

चिंद्रवली-निरखुणेवाडी रस्ता खचला दोन्ही बाजूची वाहतूक बंद करण्यात आली आहे. तेथील लोकांनी पर्याय मार्गाने प्रवास करावा अशा सुचना प्रशासनाने केल्या आहेत. केळ्ये-ठिकवाडी येथील विश्वेश्‍वर मंदिरासमोरील रस्ता खचलेला असून येथील वाहतूक बंद करण्यात आली आहे. संगमेश्‍वर तालुक्यातील साखरपा भंडारवाडी येथे नदीतील पाण्याच्या प्रवाहाने रस्त्याचे डांबर वाहून गेले आहे. काजळी नदीचा पूर सायंकाळी ओसरल्यामुळे रत्नागिरीकडे येणारी वाहतूक सुरळीत झाली.