रत्नागिरी:- विद्यार्थीदशेत वृक्ष लागवडीची प्रेरणा मिळावी आणि कोरोनानंतर हीच झाडे उत्पन्नाचे साधन बनू शकतात हा संदेश देण्यासाठी काजूची 30 हजार रोपे लागवडीचा निर्णय आजपासून अंमलात आणला जात आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत अशा उपक्रमातून ग्रामीण रोजगारालाही चालना देण्याचा प्रयत्न आहे. या रोपांची नुसतीच लागवड करायची नाही, तर यशस्वी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्या पुढील वाढदिवशी त्या रोपांचाही वाढदिवस साजरा करावयाचा आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांनी केले.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिनी संगमेश्वर तालुका शिवसेनेतर्फे विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्यामध्ये जिल्हा परीषद अध्यक्ष रोहन बने यांच्या प्ररेणेतून संगमेश्वर तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषद गटात 30 हजार काजूच्या रोपांचे मोफत वाटप करण्यात येत आहे. जिल्हा परिषद शाळांमधील प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरात चार रोपे दिली जात आहेत. त्याची सुरवात आज मुख्यमत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त केली गेली. ही रोपे तांबे नर्सरीचे मालक हेमंत तांबे यांनी उपलब्ध करून दिली. आमदार शेखर निकम, आमदार राजन साळवी, जिल्हा परिषद अध्यक्ष बने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, उपाध्यक्ष महेश नाटेकर, संतोष थेराडे, तालुकाप्रमुख प्रमोद पवार, सभापती बंडा महाडीक, जिल्हाप्रमुख विलास चाळके उपस्थित होते. माखजन, कडवई, कसबा, नावडी, कोसुंब, ओझरे, दाभोळे या गटात या तीस हजार काजु रोपांचे वाटप करण्यात आले.
श्री. बने म्हणाले, आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायचे असेल तर उत्पन्न देणार्या झाडांची लागवड केली पाहिजे. रोपे लावून ते प्रत्येक विद्यार्थ्यांने जगवले पाहिजे. दरवर्षी रोपाचा वाढदिवस विद्यार्थ्यांनी साजरा करावा.
संगमेश्वर तालुका शिवसेनेने 500 रक्तदात्यांची यांची यादी तयार केली आहे. आवश्यक तेव्हा हे दाते रक्तदान करणार आहेत. तसेच संगमेश्वर तालुक्यात येणार्या गणेश भक्तांसाठी शिवसेना विशेष प्रयत्न करणार असून त्यादृष्टीने नियोजन केले जात आहे. मुख्यमंत्री वाढदिवस साजरा करणार नसल्याने जाहिरातीसाठी, फलकांसाठी होणारा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करणार असल्याचे श्री. बने यांनी जाहीर केले.