वृक्ष तोडीमुळे महामार्गावरील सावली हरपली

रत्नागिरी:- सध्या उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून, वाढत्या उष्णतेची झळ मुंबई- गोवा महामार्गावरून प्रवास करणार्‍या प्रवाशांना देखील बसत आहे. महामार्ग तयार करताना प्रचंड प्रमाणात झालेल्या वृक्षतोडीमुळे महामार्गावरील सावली हरपली आहे.

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग हा नेहमी वर्दळीचा महामार्ग आहे. या महामार्गावरून रोजच लाखोंच्या संख्येने वाहनांची वर्दळ असते. मात्र मुंबई-गोवा महामार्गावरील सावली पूर्णपणे हरपली असून, महामार्गावरून उन्हातून प्रवास करणे घातक ठरत आहे. त्यामुळे महामार्ग सामसूम असल्याचे दिसत आहे. बारा वर्षापूर्वी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला सुरुवात करण्यात आली. त्यावेळी जुन्या महामार्गावर ठिकठिकाणी जवळपास 100 वर्षांपूर्वीची जुनी झाडे उभी होती. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर ठिकठिकाणी सावली मिळत होती व महामार्गावरून प्रवास करणार्‍या प्रवाशांना या सावलीचा आश्रय मिळत होता. मात्र 8 वर्षांपूर्वी महामार्गाचे काम सुरू करण्यात आल्यानंतर खेड ते राजापूर दरम्यान महामार्गाच्या लगत असलेली असंख्य मोठमोठी झाडे मुळासकट तोडण्यात आली. त्यानंतर महामार्गाचे काम वेगाने सुरू होऊन खेड ते चिपळूण आणि लांजा ते राजापूर दरम्यान महामार्गाचे काम पूर्णत्वास गेल्याचे दिसत आहे. मात्र, महामार्ग आता पूर्ण मोकळा दिसत असून, सावली हरपली आहे. महामार्गाचे काम झाल्यानंतर महामार्गालगत नवीन झाडे लावणे गरजेचे होते. मात्र, तसे होताना दिसत नसून प्रवासी व स्थानिक नागरिक यांच्यामधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

सध्या मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गालगत दरम्यान एकही झाड नसून प्रवाशांना महामार्गावरून प्रवास करत असताना अक्षरशः उन्हाचे चटके बसत आहेत. त्यामुळे मागील काही दिवसांपासून दुपारी बारा ते सायंकाळी चार या कालावधीत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे मंदावली असून, महामार्ग सामसूम असल्याचे दिसत आहे. महामार्गावरून प्रवास करणार्‍या दुचाकीस्वारांच्या अंगाची लाही लाही होत आहे. त्यामुळे भविष्यात महामार्गावर ठिकठिकाणी झाडे लावणे गरजेचे आहे. गेल्या 10 वर्षात महामार्ग लगत कोणत्याही प्रकारची वृक्षलागवड करण्यात आली नाही. ग्लोबल वार्मिंगचा वाढत प्रभाव वातावरणात बदल घडवूून आणत असल्याने वृक्ष लागवड चळवळ सह उष्णता वाढीस कारणीभूत ठरणार्‍या घटकांवर उपाययोजना करणे आवश्यक बनले आहे.