अ. भा. अक्षय ऊर्जा संघटनेने राज्यात काळा दिवस पाळला
रत्नागिरी:- सरकारला महाराष्ट्रात उद्योग टिकवायचे आहेत की जगवायचे आहेत, हा प्रश्न मला पडला आहे. कारण शेतकऱ्यांची स्थिती उभ्या महाराष्ट्राला कळली आहे. आता व्यापाऱ्यांवर सुद्धा तशी वेळ येणार का, इतकी ही दरवाढ प्रचंड प्रमाणात होणार आहे, असे सांगत आज रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व व्यावसायिक वाढीव वीज दरवाढीविरोधात एकवटले. जिल्ह्यातील व्यावसायिक, उद्योजक, व्यापारी, हॉटेल असोसिएशनतर्फे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांना निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी चुकीच्या पद्धतीने होणारी ही दरवाढ थांबवावी, असे सांगून रत्नागिरी जिल्हा हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष रमेश कीर म्हणाले की, रत्नागिरी जिल्ह्यात हॉटेल उद्योगाला व्यवसायाचा दर्जा दिलेला नाही. आम्ही तुम्हाला व्यवसाय दर्जा देतो, असे सांगितले. पण आजही महावितरणची बिले उद्योग व्यावसायिक दरानेच येत आहेत. हा अधिकचा भार पडतोय. याबद्दल शासन कुठेही गंभीर नाहीये. वीज नियामक आयोग घरगुती, उद्योजकांच्या वीज बिलाबाबत नवीन प्रयोग करत आहे. त्याला आमचा ठाम विरोध आहे. कोकणातलं पर्यटन फक्त कागदावर दिसत असून प्रत्यक्षात ते खूप कमी असताना वाढलेल्या वीजबिलांमुळे हॉटेल्स बंद करण्याची वेळ येऊ शकते.
राज्य सरकारने निवडणुकीत अतिशय सुंदर घोषणा केल्या. त्याबद्दल या सरकारचं अभिनंदन केलं पाहिजे. पण घोषणांची अंमलबजावणी बघायला गेलो तर ते होत नाही, असा टोला रमेश कीर यांनी हाणला. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मी वीजदर कमी केले. पण पुढच्या पाच वर्षात ते आणखी कमी होणार आहेत ते कसे कमी होणार याची माहिती नाही. गरिबांसाठी दर कमी दिसतोय. पण पुढील टप्प्यावरील दरवाढ बघून त्या ग्राहकांना फासावर चढवल्यासारखे दिसत आहे. याची गंभीर दखल शासनाने घ्यावी आणि या आयोगाशी चर्चा करावी, असे रमेश कीर यांनी स्पष्ट केले.
निवेदन देण्याकरिता अ. भा. अक्षय ऊर्जा संघटनेचे जिल्हा संचालक ऋषिकेश कोंडेकर, वसीम नाईक, रत्नागिरी जिल्हा हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष रमेश कीर, फेडरेशन ऑफ रत्नागिरी जिल्हा चेंबर ऑफ कॉमर्स अॅंड इंडस्ट्रीजचे केशव भट, लघु उद्योग असोसिएशन दिगंबर मगदूम, रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाचे सचिव धनेश रायकर, उत्तर रत्नागिरी उद्योग असोसिएशनचे अनिल त्यागी, लोटे परशुराम इंडस्ट्रीज असोसिएशनचे राज आंब्रे, दापोली औद्योगिक क्षेत्र उद्योजक असोसिएशनचे अरुण नरवणकर आदी उपस्थित होते.
निवेदन देण्याकरिता अ. भा. अक्षय ऊर्जा संघटनेचे जिल्हा संचालक ऋषिकेश कोंडेकर, वसीम नाईक, रत्नागिरी जिल्हा हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष रमेश कीर, फेडरेशन ऑफ रत्नागिरी जिल्हा चेंबर ऑफ कॉमर्स ॲड इंडस्ट्रीजचे केशव भट, लघु उद्योग असोसिएशन दिगंबर मगदूम, रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाचे सचिव धनेश रायकर, उत्तर रत्नागिरी उद्योग असोसिएशनचे अनिल त्यागी, लोटे परशुराम इंडस्ट्रीज असोसिएशनचे राज आंब्रे, दापोली औद्योगिक क्षेत्र उद्योजक असोसिएशनचे अरुण नरवणकर आदी उपस्थित होते.
हंगामी उद्योगांना ३३ टक्क्यांचा फटका
यासंदर्भात फेडरेशन ऑफ रत्नागिरी डिस्ट्रिक्ट चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे सरचिटणीस केशव भट यांनी सांगितले की, मुख्यमंत्री महोदय, नवीन वीज दरमुळे वीज दर सरासरी १० टक्क्यांनी कमी होतील. परंतु वास्तव त्यापेक्षा विपरीत असून अंधारात ठेऊन एमईआरसी आणि महावितरणने हा एकतर्फी निर्णय घेतला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात हंगामी एच.टी. ग्राहक हे प्रामुख्याने फळ प्रक्रिया उद्योग असतात. त्यांचे उत्पादन आता बंद असल्याने त्यांना पुढील हंगामात त्यांचा हंगामी वीज वापर सुरू झाल्यावरच ही दरवाढ ३३.६१% लागू झाल्याचे समजणार आहे. महाराष्ट्र शासनाने उद्योग जगातला तातडीचा दिलासा देताना एमईआरसीचा २५ जून २०२५ चा आदेश तत्काळ रद्द करावा. २८ मार्च २०२५ चा आदेश पुन्हा लागू करावा. जिल्हावार सार्वजनिक आणि औद्योगिक प्रतिनिधींची नियुक्ती अनुक्रमे जिल्हा ग्राहक संघटना आणि जिल्हा उद्योजक संघटनाच्या शिफारसीने करावी. सौर बँकिंग आणि नेट मीटरिंग पुन्हा लागू करावे.
अ. भा. अक्षय ऊर्जा संघटनेचे वसीम नाईक यांनी सांगितले की, वीज नियामक आयोगाकडून आलेली दरवाढ भरपूर आहे. घरगुती व व्यावसायिक या सर्वच ग्राहकांना मोठा धक्का बसणार आहे. त्यामुळे संघटनेतर्फे शासनाच्या या धोरणाचा निषेध नोंदवण्यासाठी आज महाराष्ट्रात काळा दिवस पाळत आहोत. आज कामकाज पूर्ण थांबवले आहे. न्यायालयात दाद मागितली असून १४ जुलैपर्यंत आदेशाला स्थगिती आली आहे. उद्योजकांना जवळपास ५१ टक्के दरवाढीला सामोरे जावे लागत आहे. सरकारने याची दखल घेऊन आदेश मागे घ्यावा.