रत्नागिरी:- वीजचोरीमुळे नियमित वीजबिल भरणार्या प्रामाणिक वीज ग्राहकांवर वीजदर वाढीचा बोजा पडतो. अशा प्रामाणिक व नियमित वीजबिल भरणार्या ग्राहकांचे हित जपणे गरजेचे आहे त्यामुळे महावितरणने वीजचोरी करणार्यांविरोधात कारवाईची बडगा उगारला आहे. त्यानुसार महावितरणच्या भरारी पथकांची नेमणूक केली आहे. कोकणात 22 पथकांकडून वीजचोरांवर लक्ष ठेवले जात आहे.
राज्यभरातील पथकांनी एप्रिल ते जून-2022 या तीन महिन्याच्या काळात वीजचोरीची तब्बल 131 कोटी 50 लाखांच्या 2 हजार 625 प्रकरणे उघडकीस आणली आहेत. वीजचोरी व विजेचा गैरवापर आणि इतर अनियमिता आटोक्यात आणण्यासाठी तसेच वीजचोरांविरूध्द अतिजलद कारवाई करण्यासाठी विभागीय स्तरावर आणखी दहा नवीन भरारी पथकांची स्थापना करण्याचे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिले आहेत.
सध्या महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागात 63 भरारी पथकांसह आठ अंमलबजावणी युनिटस कार्यरत आहेत. या भरारी पथकांनी चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल, मे आणि जून या प्रथम तिमाहीत वीजचोरीची 239.58 दशलक्ष युनिटच्या वीजचोरीची तब्बल 2 हजार 625 प्रकरणे उघडकीस आणून वीजचोरांकडून सुमारे 54 कोटी 16 लाख 66 हजारांचा दंड वसूल केला आहे. उर्वरित बिलांची रक्कमही लवकरात लवकर संबंधितांकडून वसूल करण्यात यावी, असेही निर्देश विजय सिंघल यांनी दिले.
कोकण प्रादेशिक कार्यालयांतर्गत 22, पुणे प्रादेशिक कार्यालय 14, नागपूर प्रादेशिक कार्यालय 15 तर औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयालयात 12 भरारी पथके कार्यरत आहेत. त्यात नोव्हेंबर 2021 पासून विभागीय कार्यालय स्तरावर सुरू करण्यात आलेल्या 20 भरारी पथकांचा समावेश आहे. प्रत्येक भरारी पथकाने दर महिन्याला वीजचोरीची जवळपास 20 प्रकरणे उघडकीस आणली आहेत. वीजचोरी करणे, विजेचा गैरवापर करणे किंवा अनधिकृतपणे विजेचा वापर करणे हा भारतीय विद्युत कायद्यानुसार दखलपात्र गुन्हा आहे. त्यामुळे ग्राहकांनी प्रामाणिकपणे विजेचा वापर करून कोणत्याही प्रकारे विजेची चोरी करू नये, असेही आवाहन विजय सिंघल यांनी केले आहे.









