लोवले येथे वनविभागाकडून रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी
संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यातील मौजे लोवले येथे एका कोरड्या विहिरीत पडलेल्या पाच रानगव्यांना वनविभागाने स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढून त्यांना जीवदान दिले.
याबाबत वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी, ११ फेब्रुवारी रोजी रात्री ११:३० च्या सुमारास श्री. संतोष प्रदीप खेडेकर यांच्या मालकीच्या कोरड्या विहिरीत पाच रानगवे पडले असल्याची माहिती कृषी सहाय्यक श्री. समीर दोरखडे यांनी वनविभागाला दिली. माहिती मिळताच परिमंडळ वन अधिकारी संगमेश्वर-देवरुख व त्यांच्या पथकाने आवश्यक साहित्यासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सुमारे १५ ते २० फूट खोल आणि १५ फूट व्यास असलेल्या या विहिरीची बॅटरीच्या प्रकाशात पाहणी केली असता, त्यामध्ये दोन पूर्ण वाढ झालेले मोठे रानगवे व तीन लहान पिल्ले असे एकूण पाच रानगवे अडकल्याचे दिसून आले. विहिरीची उंची जास्त असल्याने त्यांना बाहेर पडणे शक्य होत नव्हते, ही परिस्थिती लक्षात घेऊन वनविभागाने तातडीने जेसीबीच्या साहाय्याने विहिरीच्या एका बाजूने मातीचा रॅम्प (रस्ता) तयार करण्याचा निर्णय घेतला.
साधारण रात्री १:३० च्या सुमारास हा मार्ग तयार झाल्यानंतर, विहिरीत अडकलेल्या रानगव्यांच्या कुटुंबाने नैसर्गिकरीत्या या वाटेवरून बाहेर पडत जंगलाच्या दिशेने सुरक्षित प्रयाण केले. विशेष म्हणजे या संपूर्ण प्रक्रियेत रानगव्यांना कोणतीही इजा किंवा दुखापत झाली नाही. हे रेस्क्यू ऑपरेशन रत्नागिरी (चिपळूण) विभागीय वन अधिकारी श्रीमती गिरीजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड आणि परिक्षेत्र वन अधिकारी श्री. प्रकाश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सागर गोसावी, वनरक्षक आकाश कडुकर, सुरज तेली आणि सहयोग कराडे यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या पार पाडले. अशा प्रकारे वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास नागरिकांनी तात्काळ वनविभागाच्या १९२६ किंवा ९४२१७४१३३५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय वन अधिकारी श्रीमती गिरीजा देसाई यांनी केले आहे.







