विशेष बाब म्हणून जिल्ह्यात मेडिकल कॉलेज उभारणारच: ना. सामंत

रत्नागिरी:- मेडिकल कॉलेजबाबत गैरसमज पसरवणार्‍यांनी आधी त्याचा अभ्यास करावा आणि नंतर बोलावे. केंद्र शासनाच्या बृहत् आराखड्यात रत्नागिरीचे नाव नसले तरी विशेष बाब म्हणून रत्नागिरी मेडिकल कॉलेज ऊभारणार, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. विरोधकांनी समोर बसून चर्चा करावी, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी भाजपच्या पदाधिकार्‍यांना केले.  

अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर भाजपच्या विरोधकांनी त्यावर टीका केली. भाजपचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन म्हणाले, सिंधुदुर्गासह 7 जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी मिळाली; मात्र रत्नागिरी जिल्ह्यात मेडिकल कॉलेज होणार ही घोषणा हवेतच राहिली. याला उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सडेतोड उत्तर दिले. ते म्हणाले, केंद्र शासनाच्या बृहत् आराखड्यातील रत्नागिरी जिल्ह्याच्या मेडिकल कॉलेजचे नाव नाही; मात्र राज्यासाठी मेडिकल कॉलेज कसे करतात, त्याचा अभ्यास करायला हवा. त्यासाठी विधीमंडळात माहिती घेतली पाहिजे. अपूर्ण माहिती घेऊन विरोधकांनी बोलू नये. जसे बार कौन्सिल आले तसे मेडिकल कौन्सिल आहे. त्याच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर त्याला मंजुरी मिळेल. शिवसेनेने शब्द दिला म्हणजे रत्नागिरीत मेडिकल कॉलेज होणार, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे.

माझे विरोधकांना आवाहन आहे की, त्यांनी विकासात्मक चर्चेसाठी कधीही समोरासमोर बसावे. त्याला उत्तर देण्यात आम्ही सक्षम आहोत. सिव्हिल हॉस्पिटलमधील भ्रष्टाचाराचा आठ दिवसात पोलखोल करणार, असे भाजपच्या युवा नेत्यांनी स्पष्ट केले होते. आठ दिवस होऊन गेले ते अजून आहेत कुठे? असा टोलाही सामंत यांनी लगावला.