वाटद ग्रामस्थांची भूमिका; सुनावणी प्रक्रिया शांततेत
रत्नागिरी:- वाटद एमआयडीसीबाबत वाटद गावातील ग्रामस्थांच्या वैयक्तिक आक्षेपांवर मंगळवारी शांततेत सुनावणी पार पडली. यावेळी आमचा प्रकल्पाला विरोध नाही; परंतु काही महत्त्वाच्या बाबींचा लेखी खुलासा ग्रामस्थांनी मागितला असून, त्याबाबतचे निवेदन प्रांताधिकार्यांना देण्यात आले.
गावात नक्की कोणता प्रकल्प येणार? तो प्रदूषणकारी असणार का? तसेच या प्रकल्पाचा आमच्या स्थानिक ग्रामस्थांना, युवकांना काय फायदा होणार? प्रशासनाकडील प्रलंबित दाव्यांचा निकाल लवकर लावण्यात याव्यात, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
मंगळवारी उपविभागीय अधिकारी जीवन देसाई यांच्यासमोर वाटद ग्रामस्थांची सुनावणी झाली. यावेळी 103 पैकी सुमारे 80 ग्रामस्थ उपस्थित होते.?यावेळी वाटद गावचे माजी सरपंच एकनाथ सखाराम धनावडे यांनी ग्रामस्थांच्या सह्यांचे एक निवेदन प्रांताधिकारी यांना सादर केले. ग्रामस्थांनी सुरुवातीलाच आपला या प्रकल्पाला विरोध नसल्याचे प्रांताधिकार्यांना सांगितले; मात्र एमआयडीसीने प्रकल्पाबाबत सर्व माहिती सांगितली पाहिजे, असे मत उपस्थित ग्रामस्थांनी मांडले. प्रशासनाने लेखी स्वरुपात माहिती द्यावी असेही आप्पा धनावडे यांनी सांगितले. गावात कोणताही प्रदुषणकारी प्रकल्प होणार नाही याबाबत लेखी स्वरूपात खात्री प्रशासनाने द्यावी. भविष्यात आमच्या उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या आमच्या जमिनी संपादीत झाल्यावर आमच्या मुलाबाळांना या प्रकल्पात नोकरी मिळणार का याबाबतही लेखी शाश्वती देण्यात यावी. प्रकल्पासाठी आवश्यक तंत्र शिक्षण शिकवण्यासाठी परिसरात त्यासंदर्भातील प्रशिक्षण केंद्र उभारण्यात यावे.
प्रकल्पामुळे ग्रामस्थांच्या सार्वजनिक सेवा सुविधा जसे की वीज, पाणी यावर कोणताही परीणाम होणार नाही याची ग्वाही देण्यात यावी. परिसरातील अनेक जमिनींसदर्भात काही दावे प्रशासनाकडे प्रलंबित आहेत, ते लवकरात लवकर निकाली काढावेत. गरिब ग्रामस्थांना अंधारात ठेवून काही शहरातील लोकांनी कमी भावाने या परीसरातील जमिनी खरेदी केल्या आहेत. त्यामुळे आता हा शेतकरी प्रशासकीय लाभापासून वंचित रहाण्याची शक्यता आहे. त्यामुळे? ? गेल्या काही वर्षात झालेल्या जमिन खरेदी विक्री व्यवहारांची चौकशी व्हावी. प्रकल्प झाल्यावर कुशल-अकुशल कामे इथल्याच स्थानिक कामगारांना मिळावीत. प्रकल्पामुळे कोणतेही रहाते घर हलवण्यात येणार नाही यावी खात्री द्यावी अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या.









