विरोधकांचा प्रचार खोटा, पोलीस स्थानकात तक्रार दाखल करणार

महायुतीच्या नेत्यांचा थेट इशारा

रत्नागिरी:- आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी येथे ना. उदय सामंत यांच्या संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप युतीच्या नेत्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. प्रभाग क्रमांक ४ मध्ये नकली पत्रके वाटली गेल्याचा आरोप करत, याविरोधात शहर पोलीस स्थानकात लवकरच तक्रार दाखल करणार असल्याची माहिती बिपीन बंदरकर यांनी दिली. या पत्रकार परिषदेत बिपीन बंदरकर आणि दिपक पटवर्धन यांनी युतीच्या बाजूने महत्त्वपूर्ण माहिती दिली, तर सचिन वहाळकर यांचीही यावेळी उपस्थिती होती.

ना. उदय सामंत यांच्या माध्यमातून शहरात शाश्वत विकास साधला जात आहे. अनेक उल्लेखनीय विकासकामे ना. सामंत यांच्या माध्यमातून करण्यात आली आहेत. विरोधकांना सध्या बोलण्यासाठी कोणतेही ठोस मुद्दे राहिलेले नाहीत. ते केवळ जुन्या समस्या, जसे की खराब रस्ते याच गोष्टींवर भाष्य करत आहेत. युतीचे उमेदवार प्रचारात मोठी आघाडी घेत असून, त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. विरोधी पक्षात असलेल्या आघाडीत बिघाडी झाली असून, ‘उबाठा’ गट एकाकी पडल्याचे त्यांनी नमूद केले. प्रभाग ४ मध्ये फेक पत्रके वाटली जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असे पत्रकार परिषदेत बिपीन बंदरकर यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जनसामान्यांचा राष्ट्रीय चेहरा आहेत. त्यासाठी शहरपातळीवर चर्चा करण्याची गरजही नाही. युतीच्या उमेदवारांना मतदारांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असून, सभांना लोकांची मोठी गर्दी जमू लागली आहे. भाजपचे कार्यकर्ते प्रत्येक प्रभागात एकदिलाने काम करत आहेत आणि युतीला विजय मिळवून देण्यास सक्रिय आहेत. असे दिपक पटवर्धन यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेत राजेश सावंत यांनी पालिकेविरोधात केलेले आरोपही फेटाळून लावत, युतीचे उमेदवार निवडणुकीत निर्णायक विजय मिळवतील, असा विश्वास बिपीन बंदरकर आणि दिपक पटवर्धन यांनी व्यक्त केला.