रत्नागिरी:- रत्नागिरीतील ख्यातनाम बांधकाम व्यावसायिक आणि रत्नदुर्ग माऊंटेनिअर्सचे अध्यक्ष विरेंद्र वणजु यांचा नुकताच कोकण आयडॉल पुरस्काराने सन्मान करण्यात आला. साहसी पर्यटनासाठी सातत्याने झटत असलेल्या विरेंद्र वणजु यांचा सन्मान झाल्याने रत्नागिरीकरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कोकण भूमी प्रतिष्ठान व ग्लोबल कोकण यांच्या तर्फे या पुरस्काराने विरेंद्र वणजु यांना गौरवण्यात आले. रविवार २७ मार्च रोजी मुंबई येथे ग्लोबल कोकण प्रतिष्ठान मार्फत कोकण आयडॉल पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांच्यासोबत आमदार निरंजन डावखरे, पीतांबरीचे डायरेक्टर प्रभुदेसाई, संजय यादवराव, रत्नदुर्गचे केळकर सर, किशोर सावंत उपस्थित होते. सकाळी दहा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत चाललेल्या या नियोजनबद्ध सोहळ्यामध्ये पर्यटन दृष्ट्या आपण अजून खूप काही केले पाहिजे याची जाणीव आणि योग्य मार्गदर्शन मिळाले असे मनोगत अध्यक्ष श्री वीरेंद्र वणजु यांनी व्यक्त केले.