दोन महिने होती मुदत; लवकरच अंतिम अधिसूचना
रत्नागिरी:-रत्नागिरी विमानतळासाठी संपादित करण्यात येणाऱ्या जागेसाठी गेल्या दोन महिन्यामध्ये एकही हरकत आलेली नाही. २८ एकर जागेसाठीच्या हरकतीचा कालावधी आता संपुष्टात आल्याने लवकरच अंतिम १९ क्रमांकाची अधिसूचना प्रसिद्ध होणार आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात या विमानतळासाठी १०० कोटींची तरतूद करण्यात आली असल्याने विमानतळाचे उर्वरित काम लवकरच होण्याची शक्यता आहे.
मिरजोळे, तिवंडेवाडीतील विमानतळासाठी आवश्यक २८ एकर जागेची संयुक्त मोजणी ७ ते १७ डिसेंबर या कालावधीमध्ये पूर्ण झाली. ३० डिसेंबरला भूसंपादनाची अधिसूचना प्रसिद्ध झाली. त्यावर ६० दिवसामध्ये हरकती मागवण्यात आल्या होत्या. हा कालावधी आता संपुष्टात आला आहे. २३ ऑगस्ट २०१६ ला या विमानतळाचा उड्डान योजनेमध्ये समावेश झाल्यामुळे पुन्हा नागरी वाहतूक सेवेसाठी ३३ हेक्टर क्षेत्राची आवश्यकता आहे. धावपट्टी तयार असली तरी या परिसरामध्ये विमाने थांबवण्यासाठी जादा जमिनीचे भूसंपादन आवश्यक आहे. त्यासाठीची ही २८ एकर जागेचे भूसंपादन करण्यात येत आहे. या अधिसूचनेमध्ये रत्नागिरी विमानतळ येथे डॉप्लर व्हेरी फ्रिक्वेंन्सी ओम्री डायरेक्शनल रेडिओ रेंज (डिव्हीओआर) ही यंत्रणा कार्यान्वित केली जाणार असून विमानतळासाठी आवश्यक पॅरलल टॅक्सी ट्रॅक निर्माण करण्यात येणार आहे. येणाऱ्या विमानाला तत्काळ धावपट्टी रिकामी करून देण्यास त्याचा फायदा होणार आहे. संस्थापित नेविगेशनला या उपकरणामुळे विमानांशी हवाई संपर्क साधता येणार आहे.
रत्नागिरी विमानतळ तटरक्षक दलाच्या ताब्यात आहे. सागरी किनापट्टीच्या सुरक्षेसाठी गोवा ते मुंबई या दरम्यान मध्यवर्ती ठिकाण म्हणून रत्नागिरी जिल्ह्यात दलाचा तळ उभारण्यात आला आहे. देशाच्या सुरक्षेच्यादृष्टीने हा तळ अतिशय महत्वाचा आहे. काही वर्षांपासून त्याचे विस्तारीकरण सुरू आहे. धावपट्टीचे काम पूर्ण झाले असले तरी खासगी प्रवासी वाहतुकीसाठीचे अनेक प्रश्न कायम आहेत. बाधित क्षेत्रात निवासी जागांचा अंतर्भाव होत नाही म्हणून बाधित कुटुंबाच्या विस्थापनाचा व पुनर्वसनाचा प्रश्न येथे उद्भवणार नाही, असेही अधिसूचनेमध्ये स्पष्ट करण्यात आले होते.









