२८ हेक्टरपैकी २० हेक्टर संपादन : ७७.७० कोटी निधी प्राप्त
रत्नागिरी:- रत्नागिरी विमानतळासाठी प्रस्तावित २८ हेक्टर जमिनीपैकी ७० टक्के भूसंपादन पूर्ण झाले आहे. उर्वरित काम जानेवारीअखेरीस पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यासाठी लागणारा आवश्यक ७७.७० कोटी एवढा निधीही शासनाकडून प्राप्त झाला आहे. भूसंपादन झाल्यानंतर विमानतळासाठी आवश्यक जमिनीचा ताबा प्रशासनाकडे येणार आहे.
रत्नागिरी विमानतळाचा प्रश्न अनेक वर्षांपासून रखडला होता; परंतु त्याला आता गती मिळाली आहे. तटरक्षक दलाला अपेक्षित असलेल्या २८ हेक्टर जागेमुळे अनेक दिवस विमातळाचे काम रखडले होते. पालकमंत्री उदय सामंत यांनी यामध्ये पुढाकार घेतला आणि त्याला गती मिळाली आहे. रत्नागिरीकरांसाठी हा जिव्हाळ्याचा प्रश्न झाला आहे. विमानतळावरील सुरक्षेचा प्रश्न, धावपट्टी, नाईट लँडिंग, योग्य पार्किंग अशा बऱ्याच प्राथमिक प्रश्नांमुळे खासगी प्रवासी वाहतुकीच्यादृष्टीने काम रखडले आहे. हे विमानतळ लवकरात लवकर सर्व सोयीसुविधांनी सज्ज व्हावे, यासाठी प्रशासनाकडे तगादा सुरू होता. अत्याधुनिक विमानतळासाठी अपेक्षित असलेल्या जागेचे भूसंपादन ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करून लवकरच या जमिनीचा ताबा प्रशासनाकडे येणार आहे. ताबा मिळाल्यानंतर लगेचच भारतीय विमानतळ प्राधिकरण यांच्याकडून काम सुरू करण्यात येणार आहे.
विमानतळासाठी भूसंपादन करणे गरजेचे होते. यासाठी मिरजोळेसोबतच तुवंडेवाडी येथील जागा अधिग्रहित करण्यात आली आहे. प्रशासनाकडून विमानतळासाठी सुमारे २८ हेक्टर एवढी जागा संपादित करण्यात येत आहे. यामध्ये तुवंडेवाडी येथील २० हेक्टर आणि मिरजोळे येथील ८.६ हेक्टर क्षेत्राचे भूसंपादन प्रस्तावित आहे. यापैकी तुवंडेवाडी येथील जागेचे निवाडे प्रांताधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहेत तर मिरजोळेतील संबंधित जमीनमालकांना नोटिसा काढण्यात आल्या आहेत. प्रातिनिधिक स्वरूपात त्यापैकी चार खातेदारांना भूसंपादनाचे पैसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. भूसंपादनाला लागणारा निधीही शासनाकडून प्राप्त झाला आहे. आता लवकरच संबंधित जमीनमालकांना उर्वरित जमिनीसंदर्भातील निधी वितरित करण्याचे काम निवाडे घेऊन पूर्ण करण्यात येणार आहे. आहे.