रत्नागिरी:- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने दुकाने उघडण्यावर बंदी घालत दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी लागू केली आहे. तरीही अत्यावश्यक काम नसताना घराबाहेर फिरण्याबरोबर मास्क न वापरणाऱ्या २२९ जणांना १ लाख ६६ हजारांचा दंड करण्यात आला आहे. उप विभागिय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागातील पोलीस स्थानकांनी हि कारवाई केली आहे. तर तब्बल २९ जणांवर रत्नागिरी शहर, ग्रामीण, पुर्णगड, जयगड, संगमेश्वर या पोलीस स्थानकातून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
राज्यसह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. राज्यात हिच स्थिती असल्याने राज्य सरकारने नागरिकांवर बंधणे घातली आहे. आठ दिवसांपुर्वी शासनाने दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी लागू केली आहे. तर शुक्रवारी रात्रीपासून सोमवार सकाळपर्यंत संचारबंदी सुरु करण्यात आली आहे. या कालवधीत घराबाहेर पडणार्या व्यक्तीसह शासनाचे अन्य नियम धाब्यावर बसवून दुकाने उघडणे, विना मास्क सार्वजनिक स्थळी फिरणे अशांवर कारवाईचा बडगा उभारण्यात आला आहे.
रत्नागिरी उपविभागिय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांनी आपल्या अखत्यारीत असलेल्या सर्व पोलीस स्थानकांना शासनाने दिलेल्या नियमांची काटेकोरपणे अंबलबजावी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मिनी लाॅकडाऊन सुरु झाल्यापासून नियमांचे भंग करणाऱ्या २९ जणांवर रत्नागिरी शहर, ग्रामीण, पुर्णगड, जयगड, संगमेश्वर या पोलीस स्थानकातून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये व्यापार्यांसह व्यावसायिकांचा समावेश आहे. मास्क बाबत जनजागृती करुनही मास्क न घालणार्या २२० नागरिकांना १ लाख १० हजारांचा दंड करण्यात आला आहे. तर ९ अस्थापनांना ५६ हजारांचा दंड करण्यात आला आहे.