राजापूर नगरपरिषदेची धडक कारवाई
राजापूर:- राजापूर नगरपरिषद हद्दीतील तालीमखाणा परिसरात बस डेपो शेजारी सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामाप्रकरणी राजापूर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वारंवार नोटीस देऊनही बांधकाम सुरूच ठेवल्याने नगरपरिषदेने अखेर कायदेशीर पाऊल उचलले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजापूर बस डेपो शेजारी असलेल्या तालीमखाणा परिसरात आरोपी श्रीमती प्रिया अशोक गुरव आणि श्री. संदेश धनंजय करंगटकर यांनी ७ एप्रिल पासून विनापरवाना आणि अनधिकृत बांधकाम सुरू केले होते. या बांधकामाबाबत राजापूर नगरपरिषदेने संबंधित व्यक्तींना वेळोवेळी नोटीसा बजावून बांधकाम थांबविण्याचे आदेश दिले होते. मात्र, नगरपरिषदेच्या आदेशाला केराची टोपली दाखवत हे अनधिकृत बांधकाम आजतागायत सुरूच ठेवण्यात आले.
नगरपरिषदेच्या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे पाहून, नगरपरिषदेचे लिपिक समित संग्राम जाधव (वय ३२) यांनी राजापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ५३(७) अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक १२६/२०२६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
या कारवाईमुळे राजापूर शहरात विनापरवाना आणि अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.









