विनापरवाना कीटकनाशकांची विक्री करणार्‍यांवर होणार कारवाई

रत्नागिरी:- कृषीविषयक कीटकनाशकांची फवारणी करण्यासाठी कृषी विभागाचा परवाना असणे बंधनकारक आहे. विनापरवाना कीटकनाशकांची विक्री करणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

कृषी विभागाकडून कीटकनाशके साठा व विक्री, घरगुती कीटकनाशके विक्री परवाने देण्यात येतात. तसेच कीटकनाशकांची फवारणी करण्यासाठी कृषी विभागाचा परवाना असणे बंधनकारक आहे. मात्र काही भागात कीटकनाशके विक्री मेडिकल स्टोअर्स, किराणा दुकाने, सुपर मार्केट, मॉल आदी ठिकाणी विनापरवाना व्यवसाय करीत असल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. अशा अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

कीटकनाशके कायद्यान्वये साठा व विक्री घरगुती कीटकनाशके विक्री व कीटकनाशके फवारणी करणेसाठी परवाना घेणे बंधनकारक आहे.घरगुती कीटकनाशके साठा व विक्रीचे परवाने कीटकनाशक नियमानुसार कायमस्वरुपी देण्यात येतात. तसेच प्रतिबंधित कीटकनाशके वापरासाठी परवाना घेणे आवश्यक आहे. विनापरवाना व्यवसाय करणं कीटकनाशके विक्री कायद्यान्वये अनधिकृत आहे. विनापरवाना कीटकनाशके, घरगुती वापरासाठीची कीटकनाशकांचा साठा व विक्री तसेच पेस्ट कंट्रोल ऑपरेशन्स करणार्‍या विक्रेते व व्यावसायिकांवर कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार कृषी विभागाच्या गुणनियंत्रण शाखेस आहे.