विद्यार्थ्याला गंभीर मारहाण; नामांकित शाळेतील शिक्षकाविरोधात गुन्हा

रत्नागिरी:- शहरातील एका नामांकित शाळेत शिक्षकाकडून करण्यात आलेल्या मारहाणीत विद्यार्थ्याच्या कानाला गंभीर स्वरुपाची दुखापत झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना ३ जुलै रोजी घडली होती. या प्रकरणी संबंधित मुलाच्या आईने रत्नागिरी शहर पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी प्रमोद कदम या शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

विद्यार्थ्याच्या आईने शहर पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा मुलगा ३ जुलै रोजी नेहमीप्रमाणे सकाळी शाळेत गेला व दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास घरी आला. यावेळी त्याने आपला कान दुखत असल्याचे आपल्या आईला सांगितले. यावेळी आईने त्याला कानाला काय झाले, असे विचारले असता शाळेतील शिक्षक प्रमोद कदम यांनी मारहाण केल्याचे सांगितले. यानंतर मुलाला कानाच्या डॉक्टरकडे उपचारासाठी नेण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी विविध तपासण्या करुन कानाला गंभीर स्वरुपाची दुखापत झाली असल्याचे सांगितले. त्यानुसार मारहाण करण्यात आलेल्या विद्यार्थ्याच्या आईने प्रमोद कदम या शिक्षकाविरुद्ध शहर पोलिसात तक्रार दाखल केली आहे.