विद्यार्थ्यांनी ज्ञानाचा फायदा शेतकऱ्यांसाठी करावा

कोकण कृषी विद्यापीठाचा पदवीदान समारंभात राज्यपाल राधाकृष्णन यांचे प्रतिपादन

रत्नागिरी:- विद्यार्थ्यांनी मिळालेल्या पदवीचा, ज्ञानाचा, केलेल्या संशोधनाचा फायदा शेतकऱ्यांसाठी करून द्यावा. देशाच्या शेती उत्पादनात वाढ करण्याच्या दृष्टीकोनातून अधिक प्रात्याक्षिकांवर भर द्यावा, हे खरे यश असेल, असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी केले.

    डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचा ४३ वा पदवीदान समारंभ राज्यपालांच्या उपस्थितीत बुधवारी पार पडला. याप्रसंगी कृषीमंत्री डाॕ माणिकराव कोकाटे, पालकमंत्री डॉ. उदय सामंत, महसूल राज्यमंत्री योगेश कदम, कुलगुरु डॉ. संजय भावे, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, कुलसचिव डॉ. प्रदीप हळदवणेकर आदी उपस्थित होते.

राज्यपाल श्री. राधाकृष्णन मार्गदर्शन करताना म्हणाले, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कृषी क्षेत्रातील बदलत्या आव्हानांना तोंड देण्याची क्षमता सातत्याने दाखवून दिली आहे. विद्यापीठाची महाविद्यालये आणि संशोधन केंद्रे, मग ती शेती, फलोत्पादन, मत्स्यपालन, कृषी अभियांत्रिकी, वनीकरण किंवा कापणीनंतरचे तंत्रज्ञान असो, बहुआयामी संशोधनात गुंतलेली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी शेती, फलोत्पादन आणि मत्स्यपालनाचे महत्त्व सातत्याने अधोरेखित केले आहे. येथे विकसित केलेल्या तांदळाच्या जातींनी कोकण प्रदेशात उत्पादनात लक्षणीय वाढ केली आहे. कोकणातील हापूस आंबा जगभर प्रसिद्ध आहे. विद्यापीठाच्या कलम आणि उत्पादन तंत्रांमुळे या प्रदेशात आंबा लागवडीचा विस्तार झाला आहे.
केवळ नोकरीच्यामागे धावू नका. शेतीत उतरा, शेतीपुरक व्यवसाय करा. शेतमालाच्या प्रक्रिया उद्योगाला खूप संधी आहे. आपल्या या शिक्षणाचा फायदा सामान्य शेतकऱ्यांपर्यत पोहचविण्याची जबाबदारी ही तुम्ही तरूण-तरूणींवर अवलंबून आहे. आपण जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यत पोहचून आणि प्रगत शेती तंत्राज्ञानाचा अवलंब करून भारताला विकसीत राष्ट्र बनविण्यासाठी आपण नक्कीच योगदान द्याल याची मला खात्री वाटते, असेही ते म्हणाले.
    

  पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, विद्यार्थ्यांनी त्यांच्या क्षेत्रात कितीही मोठे झाले तरी, शिक्षकांना, विद्यापीठाला विसरु नये. त्यांच्या शिक्षणाचा देशाला, राज्याला कसा फायदा होईल याकडे लक्ष द्यावे. भारतातून इंग्रज निघून गेले असले तरी पदवीदान समारंभाला गाऊन घालण्याची पध्दत अजून आहे. हा पेहराव बदलून पारंपरिक पेहराव करण्याच्या दृष्टीने कोकण कृषी विद्यापीठाने प्रयत्न करावेत. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री असताना पुणे विद्यापीठासह अन्य विद्यापीठांना स्वायत्ता दिल्याने मराठमोळा पेहराव समोर आला आहे.
पीएचडीधारक, सुवर्णपदक धारक विद्यार्थ्यांचा यावेळी राज्यपालांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.