रत्नागिरी:- जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांनी नुकताच अमेरिका दौरा केला आणि अंतराळ संशोधन तसेच अमेरिकेच्या इतिहासाची प्रत्यक्ष माहिती घेतली. या दौऱ्याची सुरुवात वॉशिंग्टन डीसीपासून झाली आणि त्यानंतर त्यांनी नासाच्या केनेडी स्पेस सेंटरला भेट दिली.
दौऱ्याच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनी वॉशिंग्टन डीसीमधील स्मिथसोनियन एअर अँड स्पेस म्युझियमला भेट दिली. येथे त्यांना राईट बंधूंच्या पहिल्या विमानापासून ते अपोलो मिशनपर्यंतचा अंतराळ प्रवासाचा इतिहास पाहता आला. त्यानंतर नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्रीमध्ये त्यांनी डायनासोरचे सांगाडे, दुर्मिळ खनिजे, आणि सागरी जीवांचा अभ्यास केला. या भेटीदरम्यान, मुलांना विज्ञान आणि नैसर्गिक जगाबद्दल अधिक माहिती मिळाली.
या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांनी अमेरिकेचे संसद भवन, व्हाईट हाऊस, लिंकन मेमोरियल आणि वॉशिंग्टन मॉन्युमेंट यांसारख्या ऐतिहासिक स्थळांनाही भेटी दिल्या. या भेटीतून त्यांना अमेरिकेच्या प्रशासनाची आणि समृद्ध इतिहासाची जवळून ओळख झाली.
वॉशिंग्टन डीसीनंतर विद्यार्थ्यांनी फ्लोरिडामधील नासाच्या केनेडी स्पेस सेंटरला भेट दिली. येथे त्यांनी गेटवे: द डीप स्पेस लाँच कॉम्प्लेक्स मध्ये भविष्यातील आर्टेमिस मिशनची माहिती घेतली. तसेच, डीप स्पेस ट्राव्हल्स सिम्युलेटर्स मध्ये अंतराळातील प्रवासाचा थरारक अनुभव घेतला.
भेटीचे मुख्य आकर्षण होते स्पेस शटल ॲटलांटीस, जिथे त्यांना प्रत्यक्षात वापरलेले शटल जवळून पाहता आले. शटल लाँच एक्स्पिरिअन्स मध्ये विद्यार्थ्यांनी शटल प्रक्षेपणाचा अनुभव घेतला. या दौऱ्यात त्यांना हबल स्पेस टेलीस्कोप आणि नासाच्या विविध रॉकेट प्रोग्रॅम्सची (जसे की अपोलो, सटर्न व्ही, अर्टेमीस आणि एसएलएस) माहिती मिळाली.
हा शैक्षणिक दौरा विद्यार्थ्यांसाठी केवळ एक सहल नसून, त्यांना विज्ञान, इतिहास आणि संस्कृतीची ओळख करून देणारा एक प्रेरणादायी अनुभव ठरला. या भेटीमुळे त्यांच्या मनात विज्ञानाबद्दलची आवड अधिक वाढली आहे.