विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड वैधतेसाठी आता दि. 15 जूनची मुदत

रत्नागिरी:- विधार्थ्यांच्या आधार कार्ड वैधतेसाठी आता दि. 15 जूनची मुदत देण्यात आली आहे. त्यात काही त्रुटी निर्माण झाल्यास अधिकार्‍याकडून
प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येणार आहे. आधार वैधतेसाठी मुदत मिळाल्याने विद्यार्थी व शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.

शैक्षणिक वर्ष 2023 24 साठीची संचमान्यता आधार वैधतेनुसार करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यानुसार गेले वर्षभर विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढणे, आधार कार्डवरील तपशिलातील त्रुटी दुरूस्त करणे आदी प्रक्रिया करण्यात येत आहे. मात्र विद्यार्थ्यांची आधार कार्ड अवैध ठरत असल्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत. तसेच अनेक विद्यार्थ्यांकडे अद्यापही आधार कार्ड नसल्याचे दिसून आले आहे. आधार वैधतेनुसार संचमान्यता केल्यास आणि विद्यार्थीसंख्या कमी झाल्यास शिक्षकांची पदे कमी होण्याची भिती आहे. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी राज्य मंडळात शिक्षण विभागाची आढावा बैठक घेतली. त्यात आधार वैधतेसाठी 15 जूनची मुदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर आधार पडताळणीनुसार संच मान्यता करण्यात येणार आहे. दि. 30 नोव्हेंबर 2022 हा दिनांक गृहीत धरून आधार प्रमाणित विद्यार्थी संख्येवर संचमान्यता करताना संस्थेने काही तफावत
निदर्शनास आणून दिल्यास एक स्तर वरिष्ठ अधिकार्‍याने शहनिशा करून निर्णय घ्यावा. तसेच सबंधित प्रकरणे शिक्षण आयुक्तांच्या निदर्शनास आणून देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.