विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी जिल्हा परिषद राबणार ‘पंचसूत्री’

रत्नागिरी:- स्पर्धा परिक्षांचा पाया मजबूत करण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेेने गणेशोत्सवानंतर शिक्षणाची पंचसूत्री राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये आमचा रत्नागिरीचा भास्कराचार्य, रत्नागिरी टॅलेंट सर्च, जाणू विज्ञान अनुभवू विज्ञान, शिष्यवृत्त सराव परिक्षा आणि ध्यास व्याकरणाचा, भाषा समृध्दीचा हे पाच उपक्रम राबविण्याचे नियोजन झाले आहे. यासाठी विद्यार्थ्यांची निवडले जाणार असून प्रत्येक उपक्रमात सुमारे दहा ते चाळीस हजार विद्यार्थी समाविष्ट राहतील.

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांनी पदभार घेतल्यानंतर मागील दोन वर्षात विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीला प्राधान्य दिले होते. त्यासाठी प्राथमिक विभागातील अधिकार्‍यांबरोबर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण विभागाच्या (डाएट) सहकार्याने विविध उपक्रम राबविण्यास सुरवात केली. शिष्यवृत्तीसाठी बसणार्‍या विद्यार्थ्यांच्या सरावावर भर दिला. नवोदय विद्यालयाच्या परिक्षेसाठी विद्यार्थ्यांची तयारी करुन घेतली. नवोदयमध्ये जिल्हा परिषदेचे ४९ विद्यार्थी निवडले गेले. शिष्यवृत्ती परिक्षेत गुणवत्ता यादीत ११० विद्यार्थी चमकले. शिक्षणाचा पाया मजबूत असेल तर भविष्यात विद्यार्थी स्पर्धा परिक्षांमध्ये गुण अधिक मिळवू शकतो. हे लक्षात घेऊन डॉ. जाखड यांनी गणेशोत्सवानंतर नियमित शिक्षणाबरोबरच जादाचे उपक्रम राबविण्यावर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणीही सुरु झाली आहे. त्यासाठी शिक्षण विभागातील हुशार अधिकार्‍यांची समितीही गठीत केली. गणेशोत्सवानंतर राबवायच्या पाच उपक्रमांसाठी विद्यार्थी संख्या निश्‍चित केली आहे. त्यांना त्या पध्दतीने शिक्षण दिले जाणार आहे. यात शिक्षकांची भुमिका महत्त्वाची ठरणार आहे.

पाच उपक्रमांमध्ये शिष्यवृत्ती परिक्षांसाठी ५ वी आणि ८ वीतील विद्यार्थ्यांच्या दहा सराव परिक्षा घेतल्या जातील. विज्ञानाविषयी आवड व जिज्ञासा निर्माण करण्यासाठी जाणू विज्ञान उपक्रम हाती घेतला आहे. यामध्ये ४ थी व ७ वीचे विद्यार्थी सहभागी असतील. प्राथमिक शिक्षणाचा पाया मजबूत करतानाच गुणवत्ता वाढवून जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी डिसेंबर व जानेवारी महिन्यात प्रत्येक आठवड्याला जनरल नॉलेजवर आधारीत सराव पेपर घेण्यात येणार आहेत. रत्नागिरीचा भास्कराचार्यमधून गणित विषयाची सर्वंकष तयारी करण्यासाठी स्पर्धात्मक वातावरण बनविण्यात येईल. त्यासाठी प्रत्येक वर्गाच्या अभ्यासक्रमानुसार बीटमधून विद्यार्थी निवडून त्यांना परितोषीके जाहीर केली जातील. भाषा समृध्द करण्यासाठी व्याकरण सुधारणे गरजेचे आहे. त्यासाठी शिक्षकांना विशेष प्रशिक्षण दिले गेले आहे. विद्यार्थ्यांना व्याकरण समजेल अशा पध्दतीने शिकवले जाईल. पुढील सहा महिन्यात विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेतला जाणार आहे.