विद्यार्थी नवे मात्र अधिकारी पुन्हा तेच; नासा दौरा वादाच्या भोवऱ्यात

रत्नागिरी:- अंतराळ संशोधनाबाबत जिज्ञासा निर्माण व्हावी, यासाठी जिल्हा परिषदेने सुरू केलेल्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या नासा (अमेरिका) दौरा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. दरवर्षी विद्यार्थी नवे मात्र अधिकारी मात्र तेच असल्याने या दौऱ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. हा दौरा नेमका विद्यार्थ्यांसाठी की अधिकाऱ्यांसाठी यामुळे हा दौरा वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. 

अमेरिका येथील नासा संस्थेच्या भेटीसाठी यावर्षी  २२ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. हे विद्यार्थी नासाला जाण्यासाठी ३१ जुलैला झेप घेणार आहेत. नासा व इस्रो या अभ्यास दौऱ्यासाठी जिल्हा परिषद शाळास्तरावर विद्यार्थ्यांची चाळणी परीक्षा घेण्यात आली होती. त्यामधून ५५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. यातील २२ मुले नासासाठी निवडण्यात आली आहेत. सलग तिसऱ्या वर्षी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. नासा व इस्रो भेटीसाठी जिल्हा परिषद प्रशासनाने केंद्रस्तरावर विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली होती. त्यातून नासा-इस्रो संस्थांना भेट देण्यासाठी विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली होती. 

नासा भेटीसाठी निवड झालेले विद्यार्थी जूनच्या पहिल्या आठवड्यात दौरा करणार होते. पण भारत-पाकिस्तान युद्धामुळे हा दौरा लांबणीवर पडला होता. दोन्ही देशांनी युद्धविराम जाहीर केल्याने आता जिल्हा परिषदेचे २२ विद्यार्थी नासा दौऱ्यावर जाण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने या दौऱ्यासाठी तयारी पूर्ण केली आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेने जुलैला हे विद्यार्थी अमेरिकेत नासा जाण्यासाठी रवाना होणार आहेत.

मात्र हा दौरा आता वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. दरवर्षी विद्यार्थी नवीन मात्र अधिकारी तेच असल्याने अनेकांमधून नाराजीचा सूर उमटू लागला आहे. अनेक प्रतिभावंत शिक्षक असताना देखील तीन वर्ष दौऱ्यावर तेच तेच अधिकारी का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. 

जिल्हा परिषदेकडून करण्यात येणाऱ्या इस्रो आणि नासा दौऱ्यासाठी रत्नागिरी नगरपरिषदेच्या शिक्षण मंडळाच्या प्राथमिक शाळांमधील ७ विद्यार्थ्यांची निवड झाली होती. त्यापैकी मार्तंड नरेंद्र गावंड आणि सिद्धी संदीप स्वामी या नगरपरिषदेच्या दोन विद्यार्थ्यांची नासा दौऱ्यासाठी निवड झाली आहे.

नासा भेटीसाठी निवडण्यात आलेले विद्यार्थी

ऋतिका खापरे, शौर्य जाधव, श्रेयस पवार, जान्हवी तांबुटकर, समीक्षा बोडेकर, अंशुल पाटील, पद्मश्री गोंडाळ यशस्वी चव्हाण, देवयानी आग्रे, आदित पवार, शिवाली घुमे, सृष्टी भुवड, कार्तिकी सागवेकर, श्रावणी गमरे, सोहम बावधनकर, स्वरा लांजेकर, अर्णव शिंदे, भावना सावंत, लावण्या पवार, सुनीता तावडे.