विदर्भात पाठवण्यात येणाऱ्या आंबा, काजू कलमांची हमी फलोत्पादन किंवा कृषी विभागाने घ्यावी

रत्नागिरी:-विदर्भामधून आंबा, काजू कलमांना मागणी असेल तर त्याची हमी फलोत्पादन किंवा कृषी विभागाकडून घेतली पाहीजे. तसे झाले नाही तर रोपवाटीकाधारकांना आर्थिक भुर्दड बसेल. त्यासाठी परजिल्ह्यातून आलेल्या मागणीची लेखी हमी घेतल्यास रोपं उपलब्ध करुन देऊ, असे रत्नागिरीतील रोपवाटीकाधारकांनी फलोत्पादन विभागाला सुचित केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पचबचत सभागृहात रोपवाटीकाधारकांशी फलोत्पादन संचालक डॉ. कैलास मोते यांनी संवाद साधला. त्यावेळी रोपवाटीकाधरकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी परवानाधारक व खासगी रोपवाटीकाधारक, काजू बागायतदार व प्रक्रिया युनिट धारकांसह जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी सुनंदा कुर्‍हाडे, पणनचे सहाय्यक सरव्यवस्थापक मिलिंद जोशी, श्री. माने, श्रीमती नाईकनवरे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. हापूससह विविध प्रकारचे आंबा कलमे आणि काजू रोपांची मनरेगा योजनेतून मोठ्याप्रमाणात लागवड केली जात आहे. कोकणातील हापूसच्या कलमांना राज्यात मागणी आहे. गतवर्षी दर्जेदार रोपं मिळू शकली नव्हती. त्याचे नियोजन यंदा रोपवाटीकाधारकांनी करावे असे आवाहन डॉ. मोते यांनी केले. रोहयो योजनेमधून 2020-21 या आर्थिक वर्षात राज्यात 42 हजार हेक्टर आंबा, काजूची लागवड झाली. दरवर्षी त्यामध्ये वाढ होत आहे. गतवर्षी सप्टेंबर, ऑक्टोबर या कालवधीत राज्यातून अनेकांनी रोपांची मागणी केली होती; परंतु कोकणातील रोपवाटीकांमधून रोपं मिळाली नाहीत. विदर्भामधूनही या रोपांसाठी मागणी नोंदवली जात आहे. कोरोना काळात नवीन लागवड झाली नव्हती. त्यादृष्टीने पुढे काय करता येईल, दर्जेदार रोपं कशी उपलब्ध करुन देता येतील, रोपवाटीकाधारकांना काय अडचणी आहेत याचा आढावा डॉ. मोते यांनी घेतला.
याप्रसंगी हेमंत तांबे, राजन लेले, विनोद प्रभुदेसाई यांच्यासह काही रोपवाटीकाधारकांनी प्रश्‍न मांडले. यामध्ये कोकण कृषी विद्यापिठाकडून रोपांची अपेक्षित माहिती दिली जात नाही. चार वर्षांपुर्वी रोपं तयार केली गेली होती; मात्र म्हणावा तसा उठाव झाला नाही. त्यामुळे रोवाटीकावाल्यांना भुर्दंड बसला होता. त्यासाठी विदर्भातून खरेदी करणार्‍यांची लेखी यादी फलोत्पादन विभागाने दिल्यास त्यानुसार नियोजन करता येईल. अन्यथा रोप तयार केल्यानंतर ती विकली गेली नाही तर नुकसान होईल याकडे श्री. तांबे यांनी लक्ष वेधले. याबाबत श्री. माते यांनी हमी देण्याविषयी विचार केला जाईल असे सकारात्मक उत्तर दिले.