रत्नागिरी:- ऐतिहासिक परंपरा असणाऱ्या विठ्ठल मंदिरात शासनाचे सर्व नियम पाळून यावर्षी उत्सव होणार आहे मात्र या निमित्त भरणाऱ्या जत्रेतील फेरीवाल्यांवर प्रशासनाने बंदी घातली आहे.
या दिवशी भरणाऱ्या जत्रेसाठी परगावातून मोठ्या प्रमाणावर व्यापारी रत्नागिरीत येतात व राम आळी, विठ्ठल मंदिर आदी परिसरातील दुकानांबाहेर आपला माल थाटतात. या वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारात मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. यावर्षी कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर कार्तिकी एकादशीला बाजारपेठेत दुकानाबाहेर स्टॉल लावून विक्री करण्यास दुकानदारांना व फिरत्या विक्रेत्यांना बाजारात बसण्यास प्रशासनाने बंदी केली आहे. याची अंमलबजावणी करण्यासाठी दोन दिवस अगोदरपासून बाजारपेठेत पोलीस बंदोबस्त लावण्यात येणार असल्याची माहिती शहर पोलीस निरीक्षक अनिल लाड यांनी दिली आहे. या आदेशाबाबत बाजारपेठेतील दुकानदारांना नोटीस देखील देण्यात आली असून तिचे उलंघन करणाऱ्यांवर दखलपात्र गुन्हा दखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.