रत्नागिरी:- अनेक वर्षे वारीमध्ये सहभागी होणाऱ्या व काही कारणांमुळे प्रत्यक्ष पंढरपूरला वारीत जाणे शक्य नसल्याने मागील वर्षापासून रत्नागिरीमध्ये आषाढी वारीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये आज हजारो वारकरी सहभागी झाले. विठुरायाचा जयजयकार करत मारुती मंदिरमधून वारी सुरू होऊन विठ्ठल मंदिर येथे सांगता झाली. आषाढी एकादशीनिमित्त आज २९ जून रोजी ही वारी निघाली. वारकरी, भाविकांनी बहुसंख्येने पारंपरिक वेशात, टाळ- मृदुंग, पताकांसह सहभागी होत वारीचा आनंद लुटला.
पंढरीच्या वारीत इच्छा असूनही सहभागी होणे सर्वानाच शक्य होते असं नाही. म्हणूनच गेल्यावर्षी रत्नागिरीमध्ये आषाढवारीचे आयोजन करण्यात आले. रत्नागिरीचे शक्तीमंदिर म्हणजेच मारुती मंदिर येथे एकत्र आलेल्या हजारो भाविकांची दिंडी प्रती पंढरपूर समजल्या जाणाऱ्या रत्नागिरीच्या विठ्ठल मंदिरात पांडुरंगाच्या भेटीला गेली. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेले भाविक, खांद्यावर पताका आणि डोक्यावर तुळशी वृंदावन, जोडीला टाळ मृदुंगाच्या साथीने सुरू असलेला विठूनामाचा गजर यामुळे अवघे वातावरण विठ्ठलमय झाले होते.
चांदीच्या पादुकांची पालखी फुलांनी सजवण्यात आली होती. शक्ती मंदिर ते भक्ती मंदिर म्हणजे विठ्ठल मंदिर या मार्गावर वारीला अभुतपूर्व प्रतिसाद लाभला. मारुती मंदिर येथून वारी निघाल्यानंतर नामजप, विठुरायाची भजने, आरत्या, हिंदु धर्माचा जयजयकार सुरू होता. पुरुषांनी पारंपरिक पांढरे झब्बे लेंगे, तसेच पांढऱ्या रंगाच्या साड्या नेसून महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. भगवी पताका घेऊन माळनाका, जयस्तंभ, एसटी स्टॅंड, राम आळी, गोखले नाक्यावरून विठ्ठल मंदिरापर्यंत भाविकांचा उत्साह वाढतच चालला होता. पुरुषांनी खांद्यावर पताका आणि महिलांनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेतले होते. काहींनी टाळ- मृदुंगाची साथ आणि मुखात अखंड हरीनामाचा गजर सुरू होता. यामुळे अवघे वातावरण विठ्ठलमय झाले.